सावकारी तगाद्यापायी शेतकऱ्याने विकली किडनी; एक लाखाचे कर्ज गेले 74 लाखांवर
चंद्रपूर : शेतकऱ्यांना अनेक प्रश्न भेडसावत असतात. शेतीसाठी बँका अथवा खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले जाते. मात्र, त्याची परतफेड करता आली नाहीतर अनेक अडचणी येतात. अशीच परिस्थिती असल्याने शेतकऱ्याने चक्क स्वत:ची किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार नागभीड तालुक्यातील मिंथूर येथे घडला. एक लाखाचे कर्ज 74 लाखांवर पोहोचले असून, किडनी विकूनही कर्जाची परतफेड मात्र झाली नसल्याचेही उघडकीस आले आहे.
रोशन सदाशिव कुडे (वय ३६) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे चार एकर शेती आहे. या शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. शेतीपूरक व्यवसायासाठी त्यांनी गायी खरेदी केल्या. यासाठी दोन सावकारांकडून प्रत्येकी ५० हजारांचे कर्ज घेतले. मात्र, नशिबाने त्यांना साथ दिली नाही. गायी मृत्यूमुखी पडल्या. त्यातच शेतीही पिकेना. कर्जाचा डोंगर उभा राहिला. कर्ज फेडण्यासाठी दोन एकर शेती विकली. ट्रॅक्टर आणि घरातील साहित्यही विकले. मात्र, कर्ज काही संपेना. सावकाराकडून दिवसाला १० हजारप्रमाणे व्याज घेतले जात असल्याने एक लाखाचे कर्ज तब्बल ७४ लाखांवर गेले. शेवटी कर्ज घेतलेल्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला.
हेदेखील वाचा : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा! कुठल्याही क्षणी अटक होणार? काय आहे नेमकं प्रकरण?
दरम्यान, एका एजंटने रोशनला कोलकाता येथे नेले. वैद्यकीय तपासणीनंतर कंबोडियात त्याच्यावर शस्त्रक्रिया करून किडनी काढण्यात आली. ही किडनी कुडे यांनी आठ लाखाला विकली. अन्याय झाल्याचे लक्षात येताच रोशनने पोलिस तक्रार दिली. मात्र, कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला.
…तर मंत्रालयापुढे आत्मदहन
पैशांसाठी सावकाराकडून तगादा सुरुच आहे. पोलिस प्रशासनाकडे याबाबत मदत मागितली असता कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. हाती काहीच उरले नाही. न्याय न मिळाल्यास आता मंत्रालयात पुढे संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करणार आहोत, असे रोशन कुडे याने म्हटले आहे.
हेदेखील वाचा : Porsche Car Accident: मुलाच्या ‘त्या’ कृत्याची बापाला शिक्षा; हायकोर्टाने फेटाळला जामिन, १७ महिन्यांपासून…






