फोटो सौजन्य सोशल मिडिया
मतदानादरम्यान खंडाळ्यात समर्थकांमध्ये झालेली हाणामारी, फलटणमध्ये रामराजे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची झालेली अनपेक्षित भेट, तर माण-पाटणमधील पारंपरिक राजकीय संघर्षाने या निवडणुकीचा रंग अधिकच गडद केला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचा निकाल केवळ संचालक निवडीपुरता मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाचा नवा अध्याय लिहिणार आहे.
खंडाळा तालुका सोसायटी मतदारसंघातील अवघ्या ५० मतांची लढाई या निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी ठरली. राष्ट्रवादीचे अजय भोसले, भाजपचे अनिरुद्ध गाढवे आणि अपक्ष ॲड. शामराव गाढवे यांच्यात तिरंगी लढत झाली. प्रत्येक मत विजयासाठी निर्णायक असल्याने दोन्ही पक्षांनी मतांची जुळवाजुळव आणि मतदारांची एकजूट राखण्यासाठी विशेष व्यूहरचना आखली होती. राष्ट्रवादीने मतदारांना सहलीवर पाठवून आपली मते सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला, तर भाजपनेही विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली.
मतदानाच्या दिवशी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सकाळी अकराच्या सुमारास मतदान केंद्रावर उपस्थिती लावत आपल्या मतदारांना मतदानासाठी आणले. त्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही मतदारांसह केंद्र परिसरात हजेरी लावली. भाजपच्या मतदारांचा वाहनांचा ताफा दाखल झाल्यानंतर गर्दीतून ‘चोर-चोर’ अशी आरोळी उठली आणि दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. त्याचे रूपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले. काही काळ मतदान केंद्र परिसरात तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे प्रत्यक्ष निवडणूक आखाड्याबाहेर असले, तरी सातारा तालुक्यातील राजकीय घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष होते. महायुतीच्या जागावाटपात अधिक जागांचा त्याग करून मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पाळल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, दोन्ही राजांच्या समर्थकांची मतदान केंद्र परिसरातील उपस्थिती आणि पडद्यामागील हालचाली पाहता जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात त्यांचा रिमोट कंट्रोल महत्त्वाचा ठरणार, हे स्पष्ट झाले आहे.
फलटणमध्ये पारंपरिक राजकीय विरोधक रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मतदानाच्या निमित्ताने आमनेसामने आले. राजकीय संघर्षासाठी ओळखल्या जाणाऱ्या या दोन नेत्यांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केले आणि नमस्काराची देवाणघेवाण केली. फलटणच्या राजकारणात हा दुर्मिळ क्षण चर्चेचा विषय ठरला.
काही दिवसांपूर्वी कराडमध्ये रामराजे आणि जयकुमार गोरे एकाच व्यासपीठावर शेजारी बसून दिलखुलास गप्पा मारताना दिसले होते. या घडामोडींमुळे राजकीय विरोधकांमधील नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. रामराजेंनी राजकीय विरोधकांशी जुळवून घेण्याची भूमिका घेतल्यास त्याचे जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होतील, याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत.
महायुती म्हणून निवडणूक लढवली जात असल्याचा दावा केला जात असला, तरी माण तालुक्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे आणि मनोज पोळ, अशी प्रतिष्ठेची लढत रंगली आहे. त्यामुळे येथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई आणि सत्यजितसिंह पाटणकर यांच्यातील पारंपरिक राजकीय संघर्षानेही निवडणुकीत रंग भरला आहे. महाबळेश्वरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद संजय मोरे यांच्या पाठीशी असल्याची चर्चा असून त्यांच्यासमोर सोनाली राजपुरे यांचे आव्हान आहे. अनुसूचित जमाती आणि भटक्या प्रवर्गातील जागांवरही मोठी चुरस निर्माण झाली आहे.
विक्रमी मतदानामुळे सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने जिल्ह्यात व्यापक मोर्चेबांधणी केली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेनेनेही आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. बँकेत शिवसेनेचा प्रवेश कितपत प्रभावी ठरणार, भाजपचे संख्याबळ वाढणार की राष्ट्रवादी आपले वर्चस्व कायम ठेवणार, याची उत्सुकता आहे.
विशेषतः माणमध्ये जयकुमार गोरे बँकेत प्रवेश करणार की शेखर गोरे त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करणार, हा निकालातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. त्यामुळे ३ नोव्हेंबरला होणारी मतमोजणी ही केवळ उमेदवारांच्या विजय-पराजयाची नसून महायुतीतील अंतर्गत शक्तिपरीक्षेची आणि सातारा जिल्ह्याच्या आगामी राजकीय दिशेची निर्णायक ठरणार आहे.






