फोटो सौजन्य सोशल मीडिया
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खंडाळा तालुक्यातील विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने अजय भोसले, भाजपकडून अनिरुद्ध गाढवे, तर अपक्ष म्हणून ॲड. शामराव गाढवे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तिन्ही उमेदवारांमध्ये लढत असली, तरी मुख्य सामना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातच असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सहकार क्षेत्रातील प्रतिनिधित्व मिळवण्याबरोबरच या निवडणुकीत स्थानिक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली होती. त्यामुळे मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले.
या निवडणुकीच्या निमित्ताने मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे या दोघांचीही राजकीय ताकद पणाला लागली. आपल्या समर्थित उमेदवाराला विजय मिळवून देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी स्थानिक पातळीवर मोठी मोर्चेबांधणी केली होती.
मतदानाच्या दिवशी राजकीय हालचालींनाही वेग आला. सहलीवर गेलेल्या मतदारांसह मंत्री मकरंद पाटील यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास खंडाळ्यात प्रवेश केला. दुसरीकडे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचेही मतदारांसह छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन झाले. दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात राजकीय वातावरण तापले. राष्ट्रवादी आणि भाजपकडून शक्तिप्रदर्शन झाल्याची चर्चा सुरू झाली.
खंडाळ्यात दिवसभर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. सोसायटीसह अन्य संस्थांमधील एकूण ८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिन्ही उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. मात्र, मतदारांनी नेमका कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. अजय भोसले आपले वर्चस्व सिद्ध करणार की अनिरुद्ध गाढवे बाजी मारणार, की अपक्ष शामराव गाढवे निकालात अनपेक्षित उलटफेर घडवणार, याकडे आता खंडाळा तालुक्याचे लक्ष लागले आहे.






