(Photo - Social Media)
टिटवेवाडी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा, यंदाच्या हंगामातील पहिली उचल प्रतिटन ४५०० रुपये जाहीर करावी आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी त्यांना मिळावे, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता आरपारच्या संघर्षाची भूमिका घेतली आहे. मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एकाच दिवशी दोन ठिकाणी बेमुदत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील शेतकरी किणी टोलनाका येथे आंदोलन करणार असून, सातारा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी नागठाणे (ता. सातारा) येथील उरमोडी नदी पुलाशेजारी महामार्गावर आंदोलन करणार आहेत. त्यामुळे ऊसदराच्या प्रश्नावर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची धग अधिक तीव्र होणार आहे. (Raju Shetti)
गेल्या अनेक दिवसांपासून ऊसदराच्या प्रश्नावर कारखानदारांना चर्चेतून मार्ग काढण्याची संधी देण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार करून प्रतिटन ४५०० रुपयांची पहिली उचल जाहीर करण्याबाबत अपेक्षित सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील खटाव, कराड आणि कोरेगाव तालुक्यांत विविध ठिकाणी साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक रोखण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावरच मुक्काम करून आंदोलनाची धुरा सांभाळत आहेत. आता या संघर्षाची पुढील पायरी म्हणून नागठाणे येथे बेमुदत चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन किणी टोलनाका येथे आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. त्याचवेळी सातारा जिल्ह्यातील स्वाभिमानीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी एकजुटीने नागठाणे येथील उरमोडी नदी पुलाशेजारी महामार्गावर चक्का जाम आंदोलन करणार आहेत. त्यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर दोन ठिकाणी एकाच वेळी शेतकऱ्यांच्या हक्काचा आवाज बुलंद होणार आहे.
केवळ ऊसदराचा प्रश्नच नव्हे, तर कृष्णा, उरमोडी आणि तारळी नदीच्या पाण्याचा प्रश्नही या आंदोलनात प्रखरपणे उपस्थित केला जाणार आहे. धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असताना शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्याची वेळ आली की नियम, कायदे आणि कालवा सल्लागार समितीच्या बैठकांचे कारण पुढे केले जाते. मात्र, शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी अन्यत्र वळविले जात असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी पळविताना नियमांची अडचण येत नाही; मग तेच पाणी शेतकऱ्यांना देताना कायद्याचे दाखले का दिले जातात? अधिकार आणि सत्तेचा गैरवापर करून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करायची, शेतकऱ्यांना पाण्याची भीती दाखवायची आणि त्यांचा ऊस कमी दरात कारखान्यांकडे वळवायचा, हा प्रकार आता खपवून घेतला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका संघटनेने घेतली आहे. कृष्णा, उरमोडी आणि तारळी नदीतून शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी सोडावे, ही मागणीही नागठाणे येथील आंदोलनातून लावून धरली जाणार आहे.
ऊस उत्पादक शेतकरी जगला तरच गावातील बाजारपेठ, व्यापारी, दुकानदार, वाहतूकदार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था टिकणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी, व्यापारी, दुकानदार, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांनी ३ नोव्हेंबर रोजी नागठाणे येथे होणाऱ्या आंदोलनात एक दिवस शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऊसाला प्रतिटन ४५०० रुपये पहिली उचल आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी आता निर्णायक संघर्षाची वेळ आली आहे. कोल्हापूर-सांगलीतील शेतकरी किणी टोलनाक्यावर, तर सातारा जिल्ह्यातील शेतकरी नागठाणे येथे एकाच वेळी रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखवणार आहेत. शेतकऱ्यांच्या घामाची किंमत आणि पाण्याचा हक्क मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार, असा ठाम निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यक्त केला आहे.
‘शेतकऱ्यांना त्रास दिला तर आडवं करू!’ मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
Ans: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या घोषणेनुसार ३ नोव्हेंबर रोजी बेमुदत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
Ans: यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊसाला प्रतिटन ४५०० रुपये पहिली उचल मिळावी, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे.
Ans: कोल्हापूर-सांगलीतील शेतकरी किणी टोलनाका येथे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार आहेत. तर सातारा जिल्ह्यातील शेतकरी नागठाणे येथील उरमोडी नदी पुलाजवळ आंदोलन करणार आहेत.






