सौजन्य फोटो - टीम नवराष्ट्र
उल्हासनगर : गणेशोत्सवाच्या वर्गणीच्या पैशांचा हिशेब मागितल्याच्या वादातून मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ पश्चिमेतील जुना बालाजी नगर परिसरात घडली. ‘ओबीएन मित्र मंडळा’च्या निधीच्या हिशेबावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर मित्राचा खून करण्यात आला. हत्येनंतर आंध्र प्रदेशच्या दिशेने पळून जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या १२ तासांत धावत्या एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून अटक केली.
संदीप दिलीप मढीवाल (२९) असे मृताचे नाव असून गोविंद रामलु कोली ऊर्फ चिन्ना (३०) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी जमा झालेल्या वर्गणीच्या पैशांचा हिशेब मागण्यावरून संदीप आणि गोविंद यांच्यात वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर गोविंदने संदीपची हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांसह उल्हासनगर गुन्हे शाखेने आरोपीच्या शोधासाठी स्वतंत्र पथके तयार केली. तांत्रिक तपास तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मुंबईमार्गे आंध्र प्रदेशातील चितागुंडा येथे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
आरोपी रेल्वेने प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकासह लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये शोधमोहीम सुरू केली. पोलिसांकडे असलेल्या आरोपीच्या छायाचित्राच्या आधारे त्याचा शोध घेतला जात होता. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाला धावत्या एक्सप्रेसच्या जनरल डब्यात आरोपीची ओळख पटली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. हत्येनंतर अवघ्या १२ तासांत आरोपी जेरबंद झाल्याने तपास पथकाच्या कारवाईची चर्चा होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबरनाथ पोलीस करीत असून हत्येमागील नेमका घटनाक्रम आणि वादाची इतर कारणे तपासली जात आहेत.






