नवी मुंबईत गुटखा एजंटचा सुळसुळाट, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने टपरी चालकांना देतात धमक्या
सावन वैश्य, नवी मुंबई: शहरामध्ये गुटखा विक्री बंदी असतानाही गुटख्याची सरास विक्री होत आहे. यामुळे गुटखा खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नवी मुंबई परिसरात गुटखा एजंटचा सुळसुळाट झाला आहे. गुटक्याचा माल आमच्याकडूनच घ्यायचा, नाही तर माल विकायचा नाही नाही असं मोठ्या साहेबांनी सांगितलं असल्याचे सांगत टपरी चालकांना हे एजंट धमक्या देत असल्याचे एकाच व्हायरल सीसीटीव्ही मध्ये समोर आला आहे.
या गुटखा एजंटचे दोन सीसीटीव्ही फुटेज वायरल झाले आहेत. यातील एक व्हिडिओ हा गतवर्षातील ऑक्टोबर महिन्यातील आहे. यामधील एक एजंट हा टपरी चालकाला माझ्याकडून माल विकत घे नाहीतर पोलिसांकडून कलम लावून तुला सहा महिने जेलमध्ये बसवेल, अशी धमकी देतानाचा व्हिडिओ आहे. तर दुसरा व्हिडिओ हा चालू वर्षातील जानेवारी महिन्यातला असून यामध्ये एक एजंट हा टपरी चालकाला बोलतो की जेवढा माल शिल्लक आहे तेवढा विकून टाकायचा, नंतर माल विकायचा नाही. असे सिनियर साहेबांनी सांगितले. हे सर्व संभाषण सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालं आहे. हे दोन्हीही सीसीटीव्ही नेरूळ परिसरातील एका टपरी वरील आहेत. दोन्ही एजंटचा बोलताना चा आत्मविश्वास पाहता खरंच कोणत्या पोलीस अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचे या एजंट लोकांना पाठबळ आहे का? असा प्रश्न उपस्थित आहे. जर तसे काही नसेल तर पोलीस अधिकाऱ्यांचे नाव घेऊन टपरी चालकाला धमकी देणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी जेणेकरून जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलिन होणार नाही.
एकीकडे नशा मुक्त नवी मुंबई या अभियानासाठी नवी मुंबई पोलीस विविध कारवाया करताना दिसत आहेत. नशा मुक्तीसाठी जॉन अब्राहम सारखे मोठे मोठे सेलिब्रिटी प्रचारासाठी नवी मुंबईत येत आहेत. जर हे गुटखा एजंट अशा प्रकारे पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचं काम करत असतील, तर या गुटखा एजंट वर पोलीस कारवाई करणार का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
अनेकांना गुटखा जन्य पदार्थ सोडण्याची इच्छा असते. मात्र ते कशी सोडावी असा प्रश्न असतो. यासाठी नागरिकांनी गुटखा खाणाऱ्या नागरिकांची साथ सोडावी. गुटखा खायची इच्छा झाल्यास शंभरच्या उलट मोजणी करावी. सोबत शेंगदाणे मनुके इत्यादी पदार्थ ठेवावे. यासोबतच लवंग, इलायची देखील सोबत ठेवू शकता या गोष्टी केल्या तर तुम्ही गुटखा खाण्यापासून नियंत्रण मिळू शकतात. नागरिकांनी गुटखा जन्य पदार्थ खाऊन रोगाला आमंत्रण देऊ नये. असे पदार्थ खाणं टाळावं काही समस्या असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावे. डॉक्टरांचा तात्काळ सल्ला घेऊन उपचार केल्यास भविष्यातील धोके टाळता येऊ शकते.