
मालेगाव बलात्कार अन् हत्या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक; सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कोयता गँग, ड्रग्ज माफिया, रेती माफिया, आका, खोक्या यांचा नंगानाच सुरु आहे. सत्ताधारी पक्षाच्या आशिर्वादाने गुंड खुलेआम फिरत आहेत. मागील काही महिन्यातील घटना पाहता सरकारच्या आशिर्वादाने गुंडगिरी फोफावल्याचे दिसते. माफिया, गुंड, भ्रष्ट लोकांना सत्ताधारी पक्षात प्रवेश देऊन पवित्र करून घेतले जात आहे. सरकारच गुन्हेगारांना राजाश्रय देत असेल तर गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढणारच पण सरकारला त्याचे काही सोयरसुतक राहिलेले नाही. पोलीस केवळ विरोधीपक्षांच्या लोकांवर कारवाई करण्यासाठी, विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकावण्यासाठी, विरोधकांचे फोन टॅप करण्यासाठी ठेवलेले आहेत.
फलटणमध्ये डॉ. संपदा मुंडेला राजकीय व पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली. या घटनेत सत्ताधारी भाजपाचा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव आहे पण मुख्यमंत्री तथा गृहमंत्री कोणतीही चौकशी न करताच निंबाळकरांना क्लिन चिट देतात. आजही डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळालेला नाही आणि गुन्हेगार मात्र सरकारच्या आशिर्वादाने ताठ मानेने फिरत आहे. मालेगावच्या घटनेने जनतेच्या मनात प्रचंड संताप आहे. आरोपीला न्यायालयात आणले असता हा उद्रेक सर्वांनी पाहिला आहे. सरकारने आतातरी जागे व्हावे नाहीतर जनतेचा उद्रेक तुमच्या खुर्च्या उखडून टाकेल, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या प्रचाराचा झंझावात
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री व पैठण येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीनिमित्त आढावा बैठक आणि कार्यकर्ता मेळावा घेतला तसेच भोकरदन येथे प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख, कल्याण दळे, प्रदेश सचिव कमाल फारुकी आदी उपस्थित होते.