
बहिणीशी बोलत नसल्याने पतीने केली पत्नीची हत्या; आरडाओरड करणाऱ्या स्वत:च्या मुलावरही चाकूने वार
पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नीची कथितरीत्या गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. एवढेच नव्हे, तर हा प्रकार पाहून आरडाओरड करणाऱ्या 17 वर्षीय मुलाचीही ओढणीने गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मुलाने स्वतःचा जीव वाचवून घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मुलाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली.
राजगुरुनगर येथील वाडा रोडवरील संगम गार्डन इमारतीत ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र शिवाजी दौंडकर याचा पत्नी दीपा दौंडकर यांच्याशी वाद झाला होता. पत्नी आरोपीच्या बहिणीशी बोलत नसल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येते. या वादातून संतापलेल्या महेंद्रने बेडरूममध्ये पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.
मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
घटनेनंतर जखमी अथर्व दौंडकर याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, खेड पोलिसांनी महेंद्र दौंडकर याच्याविरुद्ध हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. किरकोळ कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या आणि मुलाच्या हत्येचा प्रयत्न झाल्याने राजगुरुनगर परिसरात खळबळ उडाली आहे.
आईला उठवण्यासाठी गेलेल्या मुलासमोर भयावह दृश्य
दीपा बराच वेळ उठल्या नाहीत म्हणून त्यांचा १७ वर्षीय मुलगा अथर्व त्यांना पाहण्यासाठी बेडरूममध्ये गेला. त्यावेळी त्याला आई मृतावस्थेत दिसली. हा प्रकार उघड होण्याच्या भीतीने आरोपी वडिलांनी अथर्वचाही ओढणीने गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मुलावरच केले चाकूने वार
अथर्वने कसाबसा स्वतःचा बचाव केला आणि घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने चाकूने मारण्याची धमकी देत त्याच्यावर हल्ला केला. यात अथर्वच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली.
तंबाखू न दिल्यामुळे मारहाण
तंबाखू देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तिघांनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. एका आरोपीने बर्फ फोडण्याचा टोचा डोळ्याजवळ मारल्याने तरुण जखमी झाला आहे. येरवड्यातील गाडीतळ बसस्टॉप परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी प्रकाश ज्ञानदेव कुसाळकर (वय ३५, रा. भाजी मंडई, येरवडा) आणि त्याच्या दोन साथीदारांवर लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुल रमेश विटकर (वय ३०, रा. शितळादेवी मंदिरामागे, सेवक चौक, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.