
दिवे-बोपदेव घाटाच्या तोंडावर अवैध धंद्यांचे जाळे; पोलिसांच्या कारवाईनंतरही हुक्का पार्लर, दारूची विक्री सुरूच
सासवड : पुरंदर तालुक्यातील दिवे आणि बोपदेव घाटाच्या परिसरात अवैध व्यावसायिकांनी आपले जाळे पसरविले असून, हुक्का पार्लर, बेकायदेशीर दारूविक्रीसह विविध अवैध धंदे सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई करूनही काही तासांतच हे धंदे पुन्हा सुरू होत असल्याने संबंधित व्यावसायिकांमध्ये पोलिसांचा धाक राहिला आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
पुरंदर तालुक्यातील घाटमाथे अवैध व्यावसायिकांसाठी नंदनवन ठरत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. चरस, गांजा, अफू, दारू यांसारख्या अमली पदार्थांची तसेच बेकायदेशीर वस्तूंची विक्री होत असल्याची चर्चा असून, हॉटेल आणि कॅफेच्या नावाखाली विविध अवैध व्यवसाय सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेषतः या परिसरात हुक्का पार्लरची संख्या वाढत असून, त्यावर पोलिसांकडून वारंवार कारवाई केली जात आहे. बोपदेव घाटाच्या तोंडावर असलेल्या भिवरी व आस्करवाडी परिसरातील हॉटेल कसूल कॅफे येथे सासवड पोलिसांनी कारवाई करून जवळपास एक लाख रुपयांचे हुक्का पार्लरचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच हॉटेलवर यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती.
झेंडेवाडी परिसरातही कारवाया
याच परिसरातील द फॉरेस्ट हॉटेलवरदेखील पोलिसांनी कारवाई करून सुमारे ५२ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बोपगाव रोडवरील हॉटेल महाकाल येथे बेकायदेशीर दारूविक्रीप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. याशिवाय हॉटेल बिलीयन्स आणि हॉटेल ताहिती येथेही काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई केली होती. झेंडेवाडी परिसरातील अनेक हॉटेलमधून अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी यापूर्वी कारवाई केली आहे.
कारवाईनंतरही धंदे पुन्हा सुरू
सध्या सासवड पोलिसांकडून बोपगाव, भिवरी आणि आस्करवाडी परिसरातील हुक्का पार्लरवर मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात येत आहेत. मात्र, कारवाई केल्यानंतर संबंधित व्यवसाय कायमस्वरूपी बंद होण्याऐवजी पुन्हा त्याच जोमाने सुरू होत असल्याने पोलिसांचा संबंधित व्यावसायिकांवर धाक राहिला नाही का, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. हॉटेलवर कारवाई झाल्यानंतर मालकांऐवजी कामगारांवर गुन्हे दाखल केले जात असल्याने मूळ मालकांना अभय मिळत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे हॉटेल मालकांची भूमिका तपासून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पुणे परिसरातील अवैध धंद्यांचे पुरंदरमध्ये स्थलांतर?
पुणे शहर आणि परिसरातील अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर काही व्यावसायिकांनी पुरंदर तालुक्यात आपले व्यवसाय सुरू केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचेही सांगितले जात आहे. हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली काही ठिकाणे गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनत असल्याचा आरोप आहे. जिल्ह्याच्या विविध भागांत गुन्हे करून काही संशयित या परिसरात येत असल्याने स्थानिक गुन्हेगारीलाही पाठबळ मिळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
हे सुद्धा वाचा : टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात
नाकाबंदीबरोबर कायमस्वरूपी पोलिस चौकी प्रस्तावित
संतोष घोळवे, पोलिस निरीक्षक, सासवड यांनी सांगितले की, भिवरी परिसरातील अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. काही हॉटेल्सना विहित परवानग्या आहेत का, तसेच तेथे कामावर असलेल्या कामगारांबाबतची माहिती संकलित करण्यात येत आहे. यापुढेही अशा ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबंधित हॉटेलच्या मूळ मालकांची या अवैध व्यवसायात काय भूमिका आहे, याचाही शोध घेण्यात येणार असून, दोष आढळल्यास मालकांवरही कारवाई केली जाईल. भिवरी परिसर शहरालगत असल्याने या भागात नाकाबंदी सुरू करण्यात येत आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांसह रात्री-अपरात्री संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या वाहनांवरही कारवाई केली जाणार आहे.