
दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनर कार अडवून राहुरीच्या तरुण उद्योजकाला लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुख्य सूत्रधार परशुराम मोहन गायकवाड (वय २४) अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. लुटीनंतर पोलिसांचा माग काढणे कठीण जावे म्हणून मोबाइल व ऑनलाइन व्यवहार टाळणारा परशुराम गाड्यांच्या अॅक्सेसरीज आणि सेकंडहॅण्ड कार खरेदीसाठी दिल्लीला गेला. मात्र, नातेवाइकाच्या नावाने घेतलेले नवीन सीमकार्ड सुरू करताच त्याचे लाइव्ह लोकेशन पोलिसांना मिळाले. त्यावरून एलसीबीच्या पथकाने दिल्लीतील एका ठिकाणी छोले-भटुरे खात असताना परशुराम आणि करण भरत जाधव यांना अटक केली आहे.
तांत्रिक तपासासोबतच टोळीतील खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबीचे पाच जणांचे विशेष पथक दिल्लीला रवाना झाले. परिसराची पाहणी करून पोलिसांनी साध्या वेशात दोघांना घेरले. पोलिसांना पाहताच परशुरामने प्रतिकार करत झटापट केली; मात्र पथकाने त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत परशुराम व करणसह किरण अजिनाथ गायकवाड, अनिल जयराम जाधव आणि पंडित ऊर्फ चन्ना अप्पा लष्करे यांनाही अटक करण्यात आली आहे. अनिलकडून एक्सयूव्ही-७०० जप्त करण्यात आली आहे. किरणला बीड, अनिलला सोलापूर रोड आणि पंडित लष्करेला येवला येथून अटक करण्यात आली आहे.
परशुराम मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीचा असून, बीडमध्ये नातेवाइकांच्या मदतीने त्याने टोळी उभी केली होती. खून, दरोडा, गुटखा तस्करी आणि अन्न-औषध पथकावर केलेल्या जीवघेणा हल्ल्यासह २० हून अधिक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. आठ जिल्ह्यांतील पोलिसांना हवा असलेला परशुराम एमपीडीए अंतर्गतही फरार होता. ही कारवाई एलसीबीचे निरीक्षक विजयसिंग राजपूत, उपनिरीक्षक भारत निकाळजे आणि सुनील गोरे यांच्या पथकाने केली आहे.
हे सुद्धा वाचा : अनैतिक संबंधातून वाद, महिलेचा भरदिवसा खून; पन्हाळा तालुक्यातील घटनेनं खळबळ
पण सीमकार्डने घात केला
पोलिसांच्या तांत्रिक तपासापासून बचावण्यासाठी परशुरामने जुना मोबाइल बंद ठेवला होता. ऑनलाइन व्यवहार टाळून तो लाखो रुपयांची रोकड बाळगत असे. इंटरनेटसाठी हॉटेल किंवा इतरांचे वाय-फाय वापरत होता. मात्र, महिनाभरापूर्वी नातेवाइकाच्या नावाने घेतलेले सीमकार्ड दिल्लीमध्ये सुरू केले आणि त्याचीच माहिती पोलिसांच्या तपासाचा महत्त्वाचा दुवा ठरली.
खबऱ्याचीही पोलिसांना मिळाली खंबीर साथ
दिल्लीतील लोकेशन निश्चित झाल्यानंतर एलसीबीच्या पथकाला टोळीतील खबऱ्याकडून परशुराम आणि करणच्या हालचालींची माहिती मिळाली. या माहितीमुळे दोघे नेमके कुठे आहेत, हे निश्चित करण्यात पोलिसांना मदत झाली. त्यानंतर परिसराला वेढा घालून कारवाई करण्यात आली आहे.