
टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात
एसीबीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, तक्रारदार हे बिल्डिंग मटेरियल सप्लायर असून त्यांच्याकडे टाटा कंपनीचे दोन टिप्पर आहेत. या वाहनांमधून खडी, कचरा व विटांची वाहतूक केली जाते. १ सप्टेंबर रोजी तक्रारदारांच्या टिप्पर चालकाने फोन करून, बिडकीनहून कचरा भरून एमआयडीसी पैठणकडे जात असताना शेकटा फाट्यावर पोलिसांनी वाहन अडवून मालकाला फोन करण्यास सांगितल्याचे कळवले. त्यानंतर चालकाने पोलिसांशी तक्रारदारांचा फोनवर संपर्क करून दिला. त्यावेळी संबंधित पोलिसाने बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत टिप्पर चालवायचा असल्यास हप्ता द्यावा लागेल, अन्यथा वाहन चालू देणार नाही, असे सांगितल्याचा आरोप आहे. तसेच बिडकीन येथे भेटण्यासाठी बोलावून हप्त्याची रक्कम सांगणार असल्याचेही त्याने सांगितले.
तक्रारदाराने याबाबत एसीबी, जालना येथे तक्रार दिली. १ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपी हवालदाराने दोन टिप्परपैकी एका वाहनाला हप्त्यातून सूट देऊन दुसऱ्या टिप्परसाठी दरमहा १ हजार रुपये हप्ता मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर बुधवारी (दि. २) दुपारी १२.४६ ते १.४४ वाजेदरम्यान पैठण-बिडकीन मार्गावरील एमआयडीसी हद्दीत स्वराज ऑटोमोबाईलसमोर एसीबीने सापळा रचला. यावेळी टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी पंचांसमक्ष १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भारत चव्हाण यांना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. वृत्त हाती येईपर्यंत या प्रकरणी पगुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार गजानन घायवट, मनोहर भुतेकर, गणेश चेके व गजानन कांबळे यांच्या पथकाने केली आहे.