‘पाणी द्या, अन्यथा...' मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडवले कुणासाठी? नीरा–भीमा, जेऊर बोगद्यांची कामे ठप्प; कैलास पाटील आक्रमक
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांच्यासह आमदार कैलास पाटील यांनी शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) नीरा–भीमा जोड बोगदा, जेऊर बोगदा आणि मिरगव्हाण पंपगृह या महत्त्वाच्या प्रकल्पस्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रकल्पांच्या कामांची वस्तुस्थिती समोर आणत त्यांनी शासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्हा बँक निवडणुकीत महेश शिंदे ठरले ‘बाजीगर’; राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज
कृष्णा खोऱ्यातील सात टीएमसी हक्काचे पाणी धाराशिव आणि बीड जिल्ह्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नीरा–भीमा बोगदा, जेऊर बोगदा आणि मिरगव्हाण पंपगृह ही तीनही कामे पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. नियोजनानुसार नीरा नदीवरील उद्धट बंधाऱ्यातून सात टीएमसी पाणी उजनी जलाशयात आणले जाणार आहे. त्यानंतर ५.३२ टीएमसी पाणी जेऊर बोगद्याद्वारे मिरगव्हाण पंपगृहापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तेथून ३.०८ टीएमसी पाणी सीना–कोळेगाव जलाशयात, तर २.२४ टीएमसी पाणी सीना नदीत सोडण्याचे नियोजन आहे. मात्र, या संपूर्ण साखळीतील महत्त्वाची कामेच रखडल्याने मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नीरा–भीमा जोड बोगद्याची एकूण लांबी २३.६८ किलोमीटर असून त्यापैकी २०.९९ किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २.६९ किलोमीटर काम आर्थिक नियोजनाअभावी जून २०२३ पासून बंद आहे. म्हणजेच जवळपास ८९ टक्के काम पूर्ण होऊनही उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने संपूर्ण प्रकल्प अडकून पडला आहे. आज काम सुरू झाले तरी ते पूर्ण होण्यासाठी किमान एक ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
जेऊर बोगद्याची एकूण लांबी २६.८५ किलोमीटर असून आतापर्यंत २३.९७ किलोमीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. अद्याप २.८८ किलोमीटर काम बाकी आहे. विशेषतः दहिगाव ते जेऊरदरम्यान २.७१ किलोमीटर खोदकाम शिल्लक आहे. दहिगाव येथील पाणी घेणारी प्रवेश संरचनाही अपूर्ण आहे. २७ जुलै २०२४ पासून या बोगद्याचे काम बंद असल्याने पाणी वाहून नेण्याची संपूर्ण यंत्रणाच रखडली आहे.
मिरगव्हाण येथील पंपगृहासाठी १११.५८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या ठिकाणी १३ हजार ५८० अश्वशक्ती क्षमतेचे सात पंप बसविण्याचे नियोजन आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ४० टक्के काम अद्याप बाकी आहे. बोगद्यांची कामे बंद आणि पंपगृहाचे काम संथगतीने सुरू असल्याने संपूर्ण सिंचन प्रकल्पाच्या उद्दिष्टालाच खीळ बसली आहे.
यावेळी आमदार कैलास पाटील म्हणाले, नीरा–भीमा बोगदा पूर्ण झाल्याशिवाय पाणी उजनीत येणार नाही आणि जेऊर बोगदा व मिरगव्हाण पंपगृह पूर्ण झाल्याशिवाय हे पाणी सीना–कोळेगावपर्यंत पोहोचणार नाही. एका बाजूला मराठवाड्याला पाणी देण्याच्या घोषणा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष कामे बंद ठेवायची, हा प्रकार संतापजनक आहे. एकाच साखळीतील महत्त्वाची कामे रखडवून सरकार मराठवाड्याच्या जनतेच्या हक्काच्या पाण्याला अडथळा निर्माण करत आहे. ही कामे तातडीने सुरू करून पूर्ण करण्यासाठी शासनाने ठोस आर्थिक तरतूद करावी. मराठवाड्याच्या जनतेला आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष पाण्याची गरज आहे. अन्यथा जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या पाहणी दौऱ्यावेळी मकरंद राजे निंबाळकर, शिवाजी दादा सरडे, जिल्हा परिषद सदस्य सातपुते, प्रवीण कोकाटे, रवी वाघमारे, पंकज पाटील, सौदागर जगताप, राणा बनसोडे, राहुल पाटील, शौकत शेख, सुनील गरड, दयानंद थोरात, राकेश सूर्यवंशी, अमोल मुळे, मनोज पडवळ, अर्जुन पाटील, अभिराज कदम, राज जाधव, अशोक साळुंके यांच्यासह जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नाईक आणि घनवट उपस्थित होते.
E20 पेट्रोलच्या गुणवत्तेवर बीपीसीएलचे स्पष्टीकरण; 893 नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण योग्य
Ans: मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या वाटपाचा आणि नीरा–भीमा तसेच जेऊर बोगद्यांच्या रखडलेल्या कामांचा प्रश्न चर्चेत आहे.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही बोगद्यांची कामे ठप्प आहेत. त्यामुळे संबंधित पाणीपुरवठा आणि प्रकल्पाच्या कामांना गती देण्याची मागणी होत आहे.
Ans: मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे आणि रखडलेली कामे मार्गी लावावीत; अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा आमदार कैलास पाटील यांनी दिला आहे.






