पुण्यात चंदन चोरांचा सुळसुळाट; बंगल्यात घुसून झाडे चोरली
पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसात शांतता राखणाऱ्या चंदन चोरांनी पुन्हा धुमाकूळ घातला असून, कोरेगाव पार्क भागात बंगल्यात शिरून चोरट्यांनी चंदनाची दोन झाडे कापून चोरून नेल्याची घटना घडली आहेत. याप्रकरणी प्रमोद कमला राय (वय ५८, रा. समर्थनगर, आळंदी रस्ता, दिघी) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क भागात सागर चोरडिया यांचा बंगला आहे. बंगल्यात सोमवारी मध्यरात्री चोरटे शिरले. चोरट्यांनी बंगल्याच्या आवारातील चंदनाची दोन झाडे करवतीचा वापर करुन कापून नेले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी घटनास्थळी भेट दिली.
हे सुद्धा वाचा : बॅटरी चोरायला गेला अन् जाळ्यात अडकला, नागरिकाने पाठलाग करुन पकडलं
चंदन चोर पुन्हा अॅक्टीव्ह
पुणे शहर परिसरात गेल्या वर्षभरात चंदन चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरात चोरट्यांनी शांतता राखली होती. पण, पुन्हा हे चोरटे अॅक्टीव्ह झाले असून, बंगले, सोसायटी, शैक्षणिक संस्था तसेच शासकीय कार्यालयांच्या आवारात शिरुन चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रभात रस्ता, फर्ग्युसन रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, स्वारगेट भागातील मुकुंदनगर, लष्कर परिसरातील बंगल्यात शिरुन चोरचे चंदनाची झाडे कापून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. विधी महाविद्यालय रस्त्यावर चंदनाची झाडे कापून नेण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकावर हल्ला केला होता. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरणार्थ चोरट्यांवर पिस्तुलातून गोळीबार केला होता. गोळीबारात एक चोरटा जखमी झाला होता. डेक्कन पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर परिसरातून चोरट्यांना अटक केली होती.
नवी पेठेतील बंगला फोडला
पुण्यात चोेरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नवी पेठेत चोरट्यांनी बंगला फोडून चोरट्यांनी ४ लाख ८६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समीर सुधाकर देशमुख (वय ४६, रा. आनंद बंगला, लक्ष्मीकृपा सोसायटी, नवी पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, देशमुख कुटुंबीय मंगळवारी रात्री बाणेर येथील नातेवाईकांकडे गेले होते. ते राहण्यास नवी पेठेतील रामबाग कॉलनीत आहेत. बुधवारी सकाळी देशमुख कुटुंबीय नातेवाईकांकडून परतले. तेव्हा दरवाज्याचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून ४ लाख ८६ हजारांचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक विजयमाला पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. अधिक तपास उपनिरीक्षक खाडे करत आहेत.