पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; बाणेरमध्ये पादचारी महिलेचे मंगळसूत्र चोरले
पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पादचारी महिलांकडील दागिने चोरुन नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पादचाऱ्यांकडील मोबाइल संच चोरून नेण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशातचं आता पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख ४० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना बाणेर भागात घडली आहे. याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिला बाणेर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या गुरुवारी (२६ डिसेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास बाणेर परिसरातून निघाल्या होत्या. काॅर्नर स्टोन इमारतीजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक थिटे अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : दहा हजारांची लाच घेणं भोवलं; तलाठ्यासह दोघांना रंगेहात पकडले
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.
चोरट्यांकडून महिला टार्गेट
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यांसोबतच गर्दीत, प्रवासात तसेच एकट्या पादचारी जाणाऱ्या महिलांना चोरट्यांनी लक्ष केले आहे. संधी साधून चोरटे दागिने चोरून पसार होत आहेत. मात्र, या टोळ्यांचा तसेच चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू आहे.