संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वारस नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या बाणेरमधील तलाठ्यासह मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे. एसीबीच्या पथकाने तलाठ्याच्या कारची तपासणी केली. तेव्हा मोटारीत ३ लाख रुपयांची रोकड आढळून आली. याप्रकरणी तलाठ्यासह मध्यस्थावर बाणेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तलाठी उमेश विठ्ठल देवघडे (वय ३९), मध्यस्थ काळूराम ज्ञानदेव मारणे (वय ३९, रा. दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) यांच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारदाराच्या वडिलांची बाणेरमध्ये जमीन आहे. वडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्रात संबंधित जमीन तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे केली होती. २९ ऑगस्ट रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. नंतर वारस नोंद करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह बाणेर येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. नंतर तक्रारदार १८ डिसेंबर रोजी बाणेर येथील तलाठी कार्यालयात गेले. त्यांनी तलाठी उमेश देवघडे यांची भेट घेतली. तक्रारदाराच्या पत्नीचे वारस म्हणून नाव नोंदविण्यासाठी देवघडे यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदारांनी पैसे कमी करण्यास सांगितले. तडजोडीत त्यांनी देवघडे यांना दहा हजार रुपयांची लाच देण्याचे मान्य केले. त्यानंतर शुक्रवारी एसीबीच्या पथकाने बाणेर येथील तलाठी कार्यालयात सापळा लावला. तक्रारादारकडून मारणेने तलाठी देवघडे यांच्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारली. एसीबीच्या पथकाने त्याला पकडले. चौकशीत त्याने देवघडे याच्यासाठी लाच स्वीकारल्याचे कबुली दिली. पथकाने देवघडेच्या मोटारीची तपासणी केली. तेव्हा मोटारीत तीन लाख रुपयांची रोकड सापडली.
हे सुद्धा वाचा : Karad Firing Case : कराडमधील गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; आता आरोपीला…
पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली सांगलीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला पोलीस लाच घेताना हाती आली आहे. सांगलीमध्ये पोलिसाला रंगेहात पकडले आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना विश्रामबाग पोलिस ठाण्यातील महिला हवालदाराला पकडले आहे. अटक करण्यात आलेल्या महिला पोलीस हवालदाराचे नाव मनिषा नितीन कोंगनोळीकर उर्फ भडेकर (वय ४२, रा. शारदानगर, सांगली) असे आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले.
एका फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी व चौकशीत मदत करण्यासाठी मनिषा कोंगनोळीकर यांनी एका व्यक्तीकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारण्यासाठी मंगळवारी सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाजवळ त्यांनी तक्रारदारास बोलावले. याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली. त्यानुसार विभागाच्या पथकाने सांगलीवाडीत सापळा रचला होता. तक्रारदाराकडून कोंगनोळीकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर पथकाने त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी कोंगनोळीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.