पुण्यात तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण, कारणही आलं समोर; 5 जणांना अटक
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाघोली परिसरात वैमनस्यातून तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. नगर पुणे रस्त्यावरील वाघोलीत तरुणाचा खुनाचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तर त्यांच्यासोबत असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश बाळू वायकर असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नागेश बिलनार (वय २०, रा. थिटे वस्ती, खराडी), मंगेश आंबोरे (वय २३), सचिन अवसरमल (वय २३), अभिषेक गायकवाड (वय २३), राजकुमार गायकवाड (वय १८) यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. चिरंतन सतीश वाघमारे (वय २५, रा. खांदवेगनर, लोहगाव) याने याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वायकर आणि वाघमारे यांची आरोपींशी काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. ५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वायकर आणि वाघमारे वाघोली परिसरातून निघाले होते. त्या वेळी आरोपींनी त्यांना गाठले. शिवीगाळ करुन त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. वायकर आरोपींच्या तावडीतून जीव वाचविण्यासाठी पळाला. आरोपींनी पाठलाग करुन त्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड अधिक तपास करत आहेत. शहरात वैमनस्यातून खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे वाढीस लागले आहेत. बिबवेवाडीत वैमनस्यातून जामिनावर सुटलेल्या गुंडावर गोळीबार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती.
जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला
गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.