संग्रहित फोटो
पुणे : संगम डॉट कॉम या मेट्रोमनी साईटवरून पुण्यातील तरूणीशी संपर्क साधत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण करणार्या व ४५ लाख रूपये उकळणार्या काश्मिरी तरूणाला काळेपडळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला मध्यप्रदेशातील इंदोर येथून पकडण्यात आले आहे.
अमन प्रेमलाल वर्मा (वय ३८, रा. बिश्ना, जि. जम्मू काश्मिर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३० वर्षीय तरूणीने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक निरीक्षक विलास सुतार व त्यांच्या पथकाने केली आहे.
अमन मुळचा जम्मू काश्मिर येथील आहे. त्याने सोशल मिडीयावरील अथका मेट्रोमनी साईटवर बनावट आयडी तयार करून खाते उघडले होते. त्यामाध्यमातून तो वेगवेगळ्या शहरातील महिला व तरूणीशी मैत्री करत होता. यातूनच तो त्यांच्याशी जवळीक निर्माण करून आपल्या जाळ्यात ओढत होता. नंतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवून विविध कारणासाठी मोठ्या प्रमाणात रकमा उकळत होता.
दरम्यान पुण्यातील एका तरुणीला देखील त्याने अश्याच प्रकारे फसवले होते. फसवणूक झाल्यानंतर तरुणीने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तरुणीशी शारीरिक संबंध बनवून त्याने तिच्याकडून ४५ लाख उकळले होते. तिला फसवून तो पुण्यातून पसार झाला होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आरोपी अमनचा माग काढत होते. तांत्रिक माहितीत तो मध्यप्रदेशात पळून गेला असल्याचे समजले.
सखोल माहिती घेताना तो मध्यप्रदेश राज्यातील इंदोर शहरात असल्याचे समोर आले. नंतर पथकाने त्याला इंदोर येथे जाऊन ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याच्या पोलीस कोठडीचा मागणी करण्यात आली. या दरम्यान त्याच्यावर दिल्ली, फरीदाबाद, भोपाळ, इंदोर अशा विविध ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याच माहिती समोर आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने त्याला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड; ‘या’ भागात गुन्हेगाराने नशेत वाहने फोडली
उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक
गेल्या काही दिवसाखाली क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दर महिन्याला दहा टक्के परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने पिंपरी- चिंचवड मधील उच्चशिक्षित तरुणाची ८० लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अविनाश सिंग आणि रवी ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मार्केटिंग आणि साखळी पद्धतीने उच्चशिक्षित तरुणांना त्यांच्या जाळ्यात ओढत होते. याबाबत सेमिनार घेऊन त्यांना कशा पद्धतीने परतावा मिळू शकतो. याबद्दल ते पटवून द्यायचे. पिंपरी- चिंचवड शहरातील उच्चशिक्षित असलेल्या तरुणाला क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ८० लाख रुपयांना गंडा घातला आहे.