
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या वेळेत स्थानिक नागरिकांना नदीमध्ये मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन कापडणीस आणि त्यांची टीम लगेच घटनास्थळी दाखल झाले. मृत श्यामच्या डाव्या पायाला तर मृत सपनाच्या उजव्या पायाला एक जाड बेडी बांधलेली होती. दरम्यान त्या साखळीला एक मोठं टाळे लावलेले होते. पोलिसांनी कारवाई सुरु असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनसाठी दवाखान्यात पाठवले आहे.
श्याम हा मूळचा अमळनेर तालुक्यातील पाडळसरे गावचा रहिवासी. काही वर्षांपूर्वी त्याचं कुटुंब कामासाठी एरंडोल तालुक्यातील उत्राण इथे राहायला गेलं होतं. तिथे तो शेतीची कामं आणि ट्रॅक्टर चालवण्याचं काम करून घर चालवत होता.
उत्राणमध्येच त्याची ओळख सपनाशी झाली. सपना तिथे तिच्या बहिणीकडे राहत होती. ओळखीचं नंतर प्रेमात रूपांतर झालं आणि दोघांनी या वर्षी मेमध्येच प्रेमविवाह केला होता. दोघांचा संसार नुकताच सुरू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, तीन-चार दिवसांपूर्वी हे जोडपं घरातून बाहेरगावी गेलं होतं. घरच्यांना वाटलं ते कुठेतरी फिरायला गेले असतील. पण गुरुवारी थेट त्यांच्या मृत्यूची बातमी आली.
आता सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की हा प्रकार नेमका काय आहे. दोघांनी स्वतःच असं टोकाचं पाऊल उचललं का? की त्यांना कुणीतरी मारून नदीत टाकलं? कारण पाय साखळीने बांधून कुलूप लावणं हे सहजासहजी समजण्यासारखं नाही.पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे आणि तपास सुरू केला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर मृत्यूचं खरं कारण समजेल.
पोलिस त्यांच्या घरच्यांची आणि नातेवाईकांची पण चौकशी करत आहेत. त्यांच्या प्रेमविवाहाला कुणाचा विरोध होता का, त्यांना काही अडचण होती का, या सगळ्या बाजूने तपास चालू आहे.या घटनेमुळे पाडळसरे, उत्राण आणि नरडाणा या तिन्ही गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याचा असा शेवट व्हावा यामुळे सगळेच सुन्न झाले आहेत. श्यामच्या मागे त्याची आई आणि एक लहान भाऊ आहे.पुढील तपासानंतरच या मागचं सत्य बाहेर येईल.