
Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!
पुणे : जेजुरी परिसरातील बेकायदा दारूविक्रीविरोधात सातत्याने आवाज उठवून पोलिसांकडे तक्रारी करणाऱ्या एका वारकऱ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेकायदा दारूविक्रीविरोधात तक्रार केल्याचा राग मनात धरून काही जणांनी त्यांना मारहाण केल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला, तरी आरोपींवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे जीवाला धोका असल्याच्या भीतीने गाव सोडण्याची वेळ आल्याचे सांगत त्यांनी थेट पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले.
पीडित तक्रारदार हे वारकरी पंथातील असून जेजुरी आणि आसपासच्या परिसरातील अवैध दारूविक्री, उत्पादन आणि पुरवठ्याविरोधात ते कायदेशीर मार्गाने पोलिसांकडे सातत्याने तक्रारी करत होते. परिसरातील बेकायदा दारूविक्री बंद करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र, याच तक्रारींचा राग मनात धरून दारूविक्रीशी संबंधित व्यक्तींनी त्यांना गाठून बेदम मारहाण केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पाय फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले.
मारहाणीत जखमी झाल्यानंतर तक्रारदाराने रुग्णालयात उपचार घेतले. उपचारानंतर त्यांनी धाडसाने जेजुरी पोलीस ठाणे गाठून या घटनेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपींवर पुढील ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. आरोपी मोकाट फिरत असल्याने त्यांच्याकडून पुन्हा जीवाला धोका निर्माण होण्याची भीती तक्रारदाराने व्यक्त केली. त्यामुळे गावात राहणेही कठीण झाले असून, अखेर भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक जेजुरी पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचे सांगत तक्रारदाराने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी आपली आपबिती मांडली आणि आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. तक्रारदाराचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने जेजुरी पोलिसांशी फोनवरून संपर्क साधला. या प्रकरणात हलगर्जीपणा न करता आरोपींविरोधात तातडीने कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.
जेजुरी परिसरातील बेकायदा दारूविक्रीविरोधात तक्रार करणाऱ्या वारकऱ्यालाच मारहाण झाल्याच्या या प्रकारामुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी मोकाट असल्याचा तक्रारदाराचा आरोप असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर आता जेजुरी पोलीस आरोपींवर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.