महिलेवार वार करणाऱ्या हल्लेखोराला सापळा रचून पकडले; कराड पोलिसांची मोठी कारवाई
कराड : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आगाशिवनगर (मलकापूर, ता. कराड) येथे प्रेमसंबंधातून महिलेवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वहागाव (ता. कराड) येथून महिलेवर वार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी पहाटे ताब्यात घेऊन अटक केली आहे. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रविंद्र सुभाष पवार (वय ३५, रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर), असे याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मलकापूर-आगाशिवनगर येथील पीडित महिलेचे रवींद्र पवार याच्याशी प्रेमसंबंध होते. गुरुवारी दुपारी रवींद्र हा संबंधित महिलेच्या घरात गेला होता. त्यावेळी बराच वेळ त्यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र, काही वेळाने चिडून जाऊन रवींद्र याने स्वतःसोबत आणलेल्या कोयत्याने संबंधित महिलेवर वार केले. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली. आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिक त्या ठिकाणी जमले. त्याचवेळी हल्लेखोर रवींद्र पवार याने तेथून पळ काढला. नागरिकांनी जखमी महिलेला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून हल्लेखोराचा शोध सुरू केला होता. रात्री उशिरापर्यंत आगाशिवनगर डोंगर परिसरात त्याचा शोध घेतला जात होता. श्वान पथकामार्फतही त्याचा माग काढण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी पहाटे रवींद्र पवार हा वहागावच्या हद्दीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली. हल्ल्यापाठीमागील नेमके कारण तपासातून समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हे सुद्धा वाचा : मावळ हादरलं! एकावर 4 जणांचा प्राणघातक हल्ला; दांडके अन् तलवारीने बेदम मारहाण
पुतण्याने केला चुलत्याचा खून
आर्थिक वादविवादातून पुतण्याने चुलत्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना पाषाण येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय.५६,रा. पाषाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश यांचा मुलगा वरद तुपे (वय १९) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०) आणि ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. सर्व पाषाण) यांना अटक केली आहे.