
Crime News: मैत्री, लग्नाचे आमिष अन् लैंगिक शोषण; कोल्हापुरात धर्मांतर विरोधी कायद्यान्वये पहिला गुन्हा
कोल्हापूर : कोल्हापुरात धर्मांतर विरोधी कायद्यान्वये पहिला गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील गांधीनगर पोलिस ठाण्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मैत्रीतून ओळख वाढवून त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप संबंधित व्यक्तीवर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने सुरुवातीला अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. त्यानंतर तिच्यासोबत ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवले. या आमिषातून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर गांधीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संबंधित आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यातील विविध कलमांन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पुंडलिक कोळी करत आहेत. घटनेची पार्श्वभूमी, आरोपीची भूमिका आणि प्रकरणातील इतर बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हेही वाचा: Crime News: घरगुती वादातून महिलेचा खून; रक्तरंजित घटनेनंतर पतीची पोलिस ठाण्यात हजेरी
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ अंतर्गत कोणत्याही व्यक्तीचे बळजबरीने, धमकावून, फसवणूक करून, आमिष दाखवून, चुकीची माहिती देऊन किंवा लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणे हा गुन्हा मानला जातो. स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्यास संबंधित व्यक्तीला ६० दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत माहिती देणे आवश्यक असल्याचे या कायद्यात नमूद आहे. कोल्हापुरातील या प्रकरणामुळे धर्मांतर विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा सुरू झाली असून, प्रकरणाचा पुढील तपास गांधीनगर पोलिसांकडून करण्यात येत आहे.