संग्रहित फोटो
कोल्हापूर : रमणमळा पोस्ट कार्यालय चौकात भरदिवसा गोळीबार करून २०१३ मध्ये केलेल्या हेमंत बाबासो गायकवाड (वय २९) यांच्या हत्येप्रकरणी तब्बल १३ वर्षांनी न्यायालयाने निकाल दिला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी राजेंद्र आनंदा सावंत (६३), अभिजित राजेंद्र सावंत (३२) आणि धैर्यशील राजेंद्र सावंत (३६) या पिता-पुत्रांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणातील अन्य आरोपी संतोष इंगवले यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
रमणमळा परिसरात हेमंत गायकवाड आणि सावंत कुटुंबातील तरुणांमध्ये वर्चस्ववाद आणि पूर्वीच्या वादातून खटके उडत होते. २४ मे २०१३ रोजी रमणमळा येथील पोस्ट कार्यालय चौकात पुन्हा वाद झाला. त्यानंतर राजेंद्र सावंत, अभिजित आणि धैर्यशील यांनी हेमंत गायकवाड यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. या वेळी राजेंद्र सावंत यांनी रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. हेमंत यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर शशिकांत गायकवाड जखमी झाले. गोळीबारानंतर तिघेही मोटारीतून पसार झाले होते.
या प्रकरणात पोलिसांनी चार पिस्तुल जप्त करून फॉरेन्सिक तपासासाठी पाठविली होती. त्यापैकी खासगी ९ एमएम पिस्तुलमधून गोळीबार झाल्याचे बॅलेस्टिक व फॉरेन्सिक तपासातून स्पष्ट झाले. एकूण तीन राऊंड झाडण्यात आले होते. त्यातील एक गोळी हेमंत यांच्या डोक्यात लागली, दुसऱ्या गोळीचा नेम चुकला, तर तिसरी गोळी शशिकांत यांना घासून गेल्याने ते जखमी झाले.
गोळीबारानंतर पोलिसांनी अभिजित आणि धैर्यशील सावंत यांना अटक केली होती. मात्र, राजेंद्र सावंत हे फरार झाले होते. त्यांना लॉकडाऊनच्या काळात अटक करण्यात आली. त्यानंतर तिघांविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. राजेंद्र सावंत यांनी वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयातून अंतरिम जामीनही मिळवला होता.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने विविध पुरावे सादर केले. सरकारी वकील सुजाता इंगळे यांचा युक्तिवाद, बॅलेस्टिक रिपोर्ट, तांत्रिक पुरावे तसेच ११ साक्षीदारांचे जबाब न्यायालयाने ग्राह्य धरले. या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने तिघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
राजेंद्र सावंत हे १९८८ मध्ये उत्पादन शुल्क विभागात अनुकंपा तत्त्वावर कॉन्स्टेबल म्हणून सेवेत दाखल झाले होते. २००१ मध्ये त्यांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. त्यानंतर त्यांनी शिरोली, रंकाळावेस आणि ओरोस (सिंधुदुर्ग) येथे सेवा बजावली. घटना घडली तेव्हा ते सिंधुदुर्ग येथे कार्यरत होते आणि कोल्हापूरचा अतिरिक्त पदभारही त्यांच्याकडे होता. १३ वर्षांपूर्वी भरदिवसा घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेत अखेर न्यायालयाचा निकाल लागला असून, हेमंत गायकवाड हत्याप्रकरणी पिता आणि दोन मुलांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे.






