कुरुंदवाड: कुरुंदवाड शहरात सुरू असलेल्या अवैध मावा विक्री व मटका जुगार यावर कुरुंदवाड पोलीस ठाण्याने ९ जुलै रोजी सकाळच्या सुमारास चार ठिकाणी धडक कारवाई केली. यामध्ये एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (विनियमन) अधिनियम २००३ अंतर्गत तीन पानटप्यांवर छापे टाकण्यात आले. प्लेयर्स पान शॉप (सिद्धार्थ चौक) येथून नयुम झाकीर तेरदाळे याच्याकडून माव्याच्या ४० पुड्या, सुमारे एक किलो सुपारी आणि १४०० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बाणदार पान शॉप (ईगल चौक) येथून सलीम गनी बाणदार यांच्याकडून माव्याच्या ४२ पुड्या आणि ८४० रुपये जप्त करण्यात आले. राधे पान शॉप (माळभाग) येथून दत्तात्रय पुंडलिक सूर्यवंशी यांच्याकडून ३८ माव्याच्या पुड्या, दीड किलो सुपारी आणि १६६० रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदर मावा उत्पादने कोणतेही लेबल, सुरक्षेचा इशारा किंवा वैधानिक माहिती नसताना खुलेआम विक्रीस ठेवण्यात आली होती. यासंबंधी पोलीस कॉन्स्टेबल खाडे, ऐवळे आणि जडे यांनी सरकारी फिर्यादी दिल्यानंतर संबंधित कायद्याच्या कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान, नदीवेस नाका परिसरात सुरू असलेल्या मटका जुगार प्रकरणातही कारवाई करण्यात आली. अनिल दशरथ गोपने याच्याकडून २२०० रुपये आणि महादेव ऊर्फ पिंटू देवगुंडा कुडचे याच्याकडून २८०० रुपये रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला. या अवैध धंद्यांविरोधात कुरुंदवाड शहर नागरिक मंचाने माध्यमांद्वारे सातत्याने आवाज उठवला होता. या जनतेच्या मागणीला प्रतिसाद देत कुरुंदवाड पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली असून नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर पवार व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. दरम्यान कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील आस्थापने रात्री १० : ३० नंतर सुरू राहिल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे.
पुण्यातील नामांकित कंपनीला तब्बल सव्वा दोन कोटींचा गंडा; ‘तो’ ई-मेल ठरला फसवणुकीचे कारण
नामांकित कंपनीला तब्बल सव्वा दोन कोटींचा गंडा
इटलीतील कंपनीच्या नावे बनावट ई-मेल पाठवून पुण्यातील नऱ्हे भागातील एका नामांकित कंपनीची तब्बल २ कोटी ३५ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. कंपनीची इटलीतील ऑटोमोबाईल कंपनीशी करारानुसार देवाण-घेवाण सुरू होती. मात्र, सायबर चोरट्याने इटलीतील कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेला बनावट ई-मेल पाठवून ही फसवणूक केली.