
सातारा : संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे दर्शन घेऊन रात्री उशिरा आईसह घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीचे दुचाकीवरून अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस लोणंद पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कौशल्य पूर्वक तपास करून जेरबंद केले आहे. राकेश भगवान भंडलकर (वय 25. रा. तांबवे, तालुका फलटण) असे संबंधित आरोपीचे नाव आहे. या नराधमास न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या प्रकरणी संबंधित मुलीच्या आईने लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. 7 जुलै रोजी पहाटे दीड वाजता ही अल्पवयीन मुलगी आईसोबत घरी जात असताना संबंधित इसमाने आपल्या बजाज पल्सर मोटरसायकल वरून या दोघींना मी त्याच भागात जात आहे, असे सांगून गाडीवर घेतले पाडेगाव टोल नाका येथे गेल्यानंतर सदर महिलेला खाली उतरून तेथून मुलीसह पोबारा केला. नंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पाडेगाव तालुका खंडाळा येथील गावच्या हद्दीत रस्त्यावरील एका रसवंतीगृहाजवळ आडमार्गाने येऊन सोडून दिले. तसेच या घटनेची वाचता केल्यास तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपीस सापळा रचून घेतले ताब्यात
या घटनेमुळे संबंधित अल्पवयीन मुलगी प्रचंड दहशतीखाली होती. तपासी अधिकाऱ्यांनी पीडितेला विश्वासात घेऊन काही स्थळ दाखविली. त्यातील एका हॉटेलचे नाव पीडितीने सांगितल्यावर तपासाला वेग आला. लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोलीस निरीक्षक व पुणे प्रकटीकरण शाखेचे सर्जेराव सूळ, विठ्ठल काळे, संतोष नाळे, केतन लाळगे गोविंद यांनी सापळा रचून या आरोपीस त्याच्या राहत्या परिसरातून अटक केली. सदर अल्पवयीन मुलगी अनुसूचित जातीमधील असल्यामुळे आरोपीवर ॲट्रॉसिटीची केस दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन पथकांच्या माध्यमातून आरोपीचा कसून शोध घेऊन त्याला जेरबंद केले आहे. या कौशल्यपूर्वक तपासाचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे.