Crime News Live Updates
अकरावी प्रवेश प्रक्रियेतील यादी पाहण्यावरून झालेल्या वादातून पुणा कॉलेजमध्ये एका तरुणाला लाकडी बांबूने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात ७ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, १८९(२), १८९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी काहीजण ओळखीचे असून दोन अनोळखी इसमांचा समावेश आहे. ही घटना ३० जून रोजी दुपारी १२.१० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी इरफान मोहम्मद हुसेन करणुल (वय ३१, रा. युनिटी पार्क, मलिकनगर, कोंढवा) यांनी लष्कर पोलिसांत तक्रार दिली आहे.
04 Jul 2025 05:32 PM (IST)
कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवरील बलात्काराच्या घटनेने पुणे हादरलं. या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची दहा पथकं शोध घेत होती. अखेर या प्रकरणातील आरोपी पोलिसांना सापडल्याची माहिती समोर आली आहे. कोंढव्यातील तरुणीवरील अत्याचार प्रकरणात पोलीसांकडून एकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातूनच या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा तक्रारदार मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती आहे. प्रकरणातील आरोपी हा तरूणीचा जुना मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली होती.
04 Jul 2025 05:30 PM (IST)
नागपूर: गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये भाजप आणि महायुतीचा प्रचंड मोठा विजय झाला. दरम्यान या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र त्यांच्या आमदारकिला आणि विजयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्या प्रकरणात फडणवीस यांना दिलासा मिळाला आहे.
04 Jul 2025 05:29 PM (IST)
पुणे शहरातील कोंढवा परिसर पुन्हा एकदा धक्कादायक घटनेने हादरला आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावरुन मनसे आक्रमक झाली आहे. बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध करत आंदोलन केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेचं ताफ्याजवळ काळे झेंडेही दाखविले.
04 Jul 2025 04:29 PM (IST)
कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. चुलता आणि पुतण्याला लोखंडी गज, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सैदापूर (ता. कराड) येथील एका लॉजसमोर ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश सुनील पाटील ( रा. सिद्धनाथ मंदिराजवळ, वारुंजी, ता. कराड) याने याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य गायकवाड, अथर्व पाटील, निखिल शेळके, भूषण भोसले, सनी पवार, सौरभ कालेकर, गणराज पवार, पार्थ पाटील, आशिष पाटील (सर्वजण रा. कराड) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीमध्ये योगेश पाटील आणि त्याचा पुतण्या प्रथमेश अनिल पाटील हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
04 Jul 2025 04:15 PM (IST)
दोन वेळा गतविजेता कार्लोस अल्काराजने आपली विजयी मालिका सुरू ठेवली आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला, परंतु महिला गटात अपसेट पाहायला मिळत राहिला. जिथे आर्यना सबालेंका अव्वल पाच खेळाडूंच्या यादीत एकटी आहे. अल्काराजने सॅन दिएगो विद्यापीठाकडून खेळणाऱ्या जागतिक क्रमवारीतील 733 व्या क्रमांकाच्या पात्रता फेरीत ऑलिव्हर टार्केटचा 6-1, 6-4, 6-4 असा सहज पराभव करून विम्बल्डनमधील त्याची विजयी मालिका 20 सामन्यांपर्यंत वाढवली.
04 Jul 2025 04:03 PM (IST)
बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अतिशय गंभीर घटना समोर आली आहे. वंजारी समाजाचे माजी सरपंच अशोक सोनुने यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण आहे आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक सोनुने यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की त्यांचे पोलीस ठाण्यातून अपहरण करण्यात आले आहे. संपत्तीच्या वादातून त्यांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, वाद मिटवण्यासाठी पोलीस ठाण्यातून फोन आल्यानंतर सोनुने घराबाहेर पडले, पण ते पुन्हा कधी परतलेच नाहीत. महिनाभराच्या तपासानंतर लोणार पोलीस स्टेशनपासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर अशोक सोनुने यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला. या मृतदेहाला हात, पाय आणि मुंडके नसल्याने या हत्येचे क्रौर्य अधोरेखित होते. ही हत्या अत्यंत अमानुष पद्धतीने केल्याचे स्पष्ट होत आहे.
04 Jul 2025 02:58 PM (IST)
मोक्का गुन्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून फरार असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. २०२३ मध्ये त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. सुनिल संजय गायकवाड (वय २०, रा. आंबेगाव खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन चोरमले व त्यांच्या पथकाने केली आहे.
04 Jul 2025 01:25 PM (IST)
चारित्र्याच्या संशयावरून वारंवार मारहाण करणार्या पतीचा पत्नीने डोक्यात व शरिरावर ठिकठिकाणी मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल एक वर्षानंतर याप्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुग्णालयाकडून अंतिम अहवाल आल्यानंतर हा गुन्हा नोंदवल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अभिषेक अजेंट (वय २३, रा. साहिल हाईटस, चिंधेनगर, जांभुळवाडी) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे पोलिसांनी आरोपी पत्नी वृषाली अजेंटराव (वय 24, रा. साहील हाईटस, जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द) हिला अटक केली आहे. ही घटना १० जुलै २०२४ रोजी दुपारी एकच्या सुमारास साहील हाईट्स चिंधेनगर आंबेगावखुर्द येथे घडली होती. याप्रकरणी उपनिरीक्षक मोहन कळमकर यांनी आंबेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.
04 Jul 2025 12:26 PM (IST)
दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील महिलांना कोयत्याचा धाक दाखवून लूटमार करून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या एका संशयित आरोपीचे रेखाचित्र ग्रामीण पोलिसांनी तयार केले आहे. त्यासंदंर्भाने कोणाला काही माहिती असल्यास त्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील दौंड भागात सोमवारी पहाटे ही घटना घडली होती. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा माग काढण्यासाठी पथके तयार केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, दौंड, तसेच भिगवण पोलीस ठाण्यातील दहा पथके चोरट्यांचा मागावर आहेत. तरुणी व इतरांनी पाहिल्यावरून पोलिसांनी रेखाचित्र तयार केले आहे.
04 Jul 2025 11:58 AM (IST)
महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून जखमी अवस्थेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने जन्मठेपेसह ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा निकाल दिला आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. फेब्रुवारी २०१५ मध्ये घडलेल्या या घटनेत आरोपीने अत्याचार केल्यानंतर तिच्या अंगावरील सोने लुटून पळ काढला होता. राजेश मनीराम यादव (रा. वाकडेवाडी, मुळ रा. उत्तर प्रदेश) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना शिवाजीनगर येथील अनुतेज अथर्व सोसायटीत घडली होती. याप्रकरणी महिलेच्या मुलाने शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली होती.
04 Jul 2025 11:45 AM (IST)
वडगाव मावळमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरामध्ये मित्रानेच मित्राचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. ठाकूरसाई येथे कुबेर व्हिला बंगल्याच्या माळी रूममध्ये दारूच्या नशेत मित्राला आईवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्राने शिवीगाळ करणाऱ्या मित्राचा लोखंडी कुदळीने डोक्यात घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खून प्रकरणातील मयताचे नाव दिनेश लक्ष्मण गरवड (वय 36, रा. भाजे, ता. मावळ) असे आहे. या प्रकरणी फिर्यादी ज्ञानेश्वर लक्ष्मण गरवड (वय 40, रा. भाजे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव विश्वजित डेका (वय 18 वर्ष, रा. चव्हाण नगर, वडगाव मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.