सौजन्य - नवराष्ट्र टीम
इचलकरंजी : इचलकरंजी येथील पंचगंगा नदीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले आहे. घरगुती वादातून संबंधित पन्नास वर्षीय महिला पंचगंगा घाटावरुन थेट पूराच्या पाण्यात जात होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर तातडीने तिला रोखण्यात आले. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेस मुलाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
संभाव्य पूरस्थितीमुळे नदीकाठी महापालिकेच्या संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यामुळेच या महिलेला वाचविण्यास यश आले. यावेळी ती महिला ‘ मला जगायच नाही तुम्ही सोडा ‘ अशी मागणी करत होती. परंतु आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समजूत काढत तिला तेथून बाहेर आणल्याने मोठा अनर्थ टळला.
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ इचलकरंजी शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची पाणीपातळी सध्या इशारा पातळीच्या जवळ आहे. नदीची पाणी पातळी वाढत असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. शुक्रवारी अधून मधून रिपरिप तर ग्रामीण भागात व धरण क्षेत्रात पावसाचा जोर राहिला. यामुळे धरण साठ्यातही वाढ झाली असून, येत्या २४ तासांत अनेक धरणांतून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच धरणांच्या परिसरात पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तासा-तासाला एक इंचाने पाणी पातळीत वाढ होत आहे. पाऊस वाढल्याने नद्या दुथड्या भरून वाहू लागल्या आहेत. पंचगंगेची पातळी शुक्रवारी सकाळी सात वाजता ३१ फूट तीन इंच होती. ती रात्री नऊ वाजता ३२ फूट दोन इंचांवर गेली. सकाळी तीन तास पातळी स्थिर राहिली. त्यानंतर त्यामध्ये वाढ होत आहे.
राधानगरी, दूधगंगा, वारणा, तुळशी, पाटगाव, घटप्रभा या सहा धरणांतून १२ हजार ३७६ क्युसेक व आलमट्टी धरणातून एक लाख क्युसेक विसर्ग सुरू राहिला. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यासह सात बंधारे, कासारी नदीवरील तीन, भोगावती नदीवरील चार, दुधगंगा नदीवरील चार, वारणा नदीवरील पाच, हिरण्यकेशी नदीवरील चार, तुळशी नदीवरील एक, वेदगंगा नदीवरील पाच, सर्फनाला नदीवरील एक, ताम्रपर्णी नदीवरील पाच, घटप्रभा नदीवरील सात, कुंभी नदीवरील तीन, चित्री नदीवरील एक बंधारे पाण्याखाली गेले. त्याचबरोबर जिल्ह्यातील दोन राज्य मार्ग, सात प्रमुख जिल्हा मार्ग, तीन इतर जिल्हा मार्ग, आठ ग्रामीण मार्ग, एक एसटी मार्ग बंद असून, या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.