crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नाशिक शहरातून एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. यात दुचाकीवरून आजीसोबत जात असलेल्या आठ वर्षांच्या नेव्हीने नेरकर या चिमुरडीचा, भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि. ११) सकाळी, पाईपलाईन रोडवरील रिलायन्स जिओ पेट्रोलसमोर घडला आहे.
चाक थेट डोक्यावरून
सकाळच्या वेळेत, औद्योगिक वसाहितीकडे आजी आणि नाती जात होते. त्यावेळी पाईपलाईन रोडवर मागून येणाऱ्या बारा चाकी टाटा ट्रक (क्रमांक MH-17-BD-5005) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या दांडकेमुळे नेवीका रस्त्यावर पडली आणि ट्रकचे मागील चाक थेट तिच्या डोक्यावरून गेले. घटनास्थळीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून ट्रक जप्त केला आहे. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. संतप्त जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. ट्रक चालक अपघातानंतर फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.
नागरिकांनी व्यक्त केला संताप
या अपघाताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. गणेशनगरजवळील रिलायन्स पेट्रोलपंपाच्या आजूबाजूच्या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी आणि ट्रक-टेम्पोंची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे याठिकाणी स्पीड ब्रेकर, सिग्नल यांसारख्या सुविधा असाव्यात, अशी मागणी नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत. परंतु, नाशिक महापालिका व वाहतूक विभागाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने, आज एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागला, असा आरोप नागरिक करत आहेत.
मुलानेच केली आईची निर्घृण हत्या
नाशिकचं बिहार होत आहे का? असा सवाल आता विचारण्यात येत आहे. कारण नाशिकमध्ये एकाच दिवशी तीन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. सतत गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरातून सतत खुनाचे सत्र सुरूच आहे. आता पोटच्याच पोराने जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. वृद्ध महिलेला तिच्याच मुलाने गाळा आवळून हत्या केली. इतकंच नाही तर हे कृत्य केल्यानंतर मारेकरी मुलाने पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन आईच्या वृद्धापकाळाला कंटाळून आपण आईची हत्या केल्याची कबुली दिली. हि घटना अकरा-बाराच्या सुमारास नाशिकरोड शिवाजी नगर येथे घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे