
सराईत चेनस्नॅचरच्या मुसक्या आवळल्या, २४ गुन्हे उघडकीस; १३ तोळे सोने हस्तगत
सादीक अली उर्फ जाफरी सैय्यद (३०, रा. आंबेवली, कल्याण) असे संशयित आरोपीचे नाव आहे. शहरात मागील काही दिवसांपासून चेन स्नॅचिंगच्या घटना वाढीस लागल्या, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त संदिप मिटके यांनी गुन्हे शाखेला मार्गदर्शन करून आरोपीवर लक्ष केंद्रीत केले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने संशयिताचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यात तो भिवंडी तालुक्यातील अमनेगाव येथे लपून असल्याचे समोर आले. युनिट एकचे हवालदार नाझीमखान पठाण, अंमलदार मुक्तार शेख, युनिट दोनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक शंकर काळे, हवालदार सुनील आहेर यांनी ती व्यक्ती चेन स्नॅचर्स असल्याची पक्की खबर मिळवली.
हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, संदीप भांड, प्रदीम म्हसदे, विशाल देवरे, नाझीमखान पठाण, मिलोंदसिंग परदेशी, विशाल काठे, अंमलदार मुक्तार शेख, चालक हवालदार सुकाम पवार यांनी कल्याणमध्ये दोन दिवस आणि दोन रात्र साध्या वेषात सापळा रचला. दोन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सापळ्यात सापडल्यानंतर त्यास बेड्या ठोकण्यात आल्यात. पोलिस चौकशीत त्यांने २२ चेन स्नॅचिंगचे तसेच दोन वाहनचोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून दहा लाख रूपये किंमतीचे १३. ४ तोळे सोन्याच्या वजनाचे दागिने, एक कार आणि दुचाकी असा २६ लाख २४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, एपीआय हेमंत तोडकर, पीएसआय चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे यांनी आरोपीकडे खुबीने चौकशी करून मुद्देमाल हस्तगत केला.
आरोपी हा कल्याणमधील कुख्यात इराणी गँगचा सदस्य असून, त्यांच्यात दोन गट झाल्याने तो स्वतंत्र भाड्याने खोली घेऊन राहतो. जाफर हा सराईत असून, चेन स्नॅचिंग प्रकरणात त्यास मोक्का लावण्यात आला होता. नऊ महिने जेलमध्ये राहिल्यानंतर तो बाहेर आला. यानंतर त्याने पुन्हा नाशिककडे मोर्चा वळवला. तेथून तो चोरीच्या वाहनांनी शहरात दाखल व्हायचा. स्नॅचिंग झाली की लागलीच पुन्हा कल्याण अथवा श्रीरामपूर येथे जायचा.