संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : गँगवार अन् टोळ्यांच्या गुन्ह्यांनी शहर रक्तरंजित होत असताना दुसरीकडे स्ट्रीट क्राईमने सर्व सामान्य नागरिकांची “सुरक्षितता” धोक्यात आणली आहे. रस्त्यावरील गुन्ह्यांमुळे भीतीच वातावरण निर्माण झालं असून, चैन स्नॅचिंग, मोबाईल लुटमारी तसेच घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांमुळे “भयमुक्त पुणे की गुन्हेगारांचा अड्डा” आहे अशी म्हणण्याची वेळ आली आहे. पोलिस गस्त असूनही गुन्हेगारांना अजिबात भीती उरलेली नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळेच सामान्य नागरिक “पोलिस आयुक्त साहेब, इकडेही लक्ष द्या ! असे म्हणत धुमाकूळ घालणाऱ्या या गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी नम्रविनंती करू लागले आहेत.
पुणे शहरात अवघ्या पंधरवड्यात कोथरूड, बाणेर, विमाननगर, कात्रज, कोंढवा आणि इतर शहरात तब्बल वीसहून अधिक चैन स्नॅचिंग आणि चोरीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. अगदी न कळत हे चोरटे “स्लो” मेशनमध्ये महिलांच्या जवळ येत त्यांच्या गळ्यातील सोन साखळी जबरदस्तीने हिसकावून गाडीचा वेग सुसाट ठेवत क्षणताच पोबारा करतात. महिला व नागरिक अचानक झालेल्या या हल्याने घाबरलेले असतात. काहींनी पाठलाग केला तरी ते सापडत नाहीत. काही वर्षांपुर्वी पुण्यात अशाच पद्धतीने टोळ्या सक्रिय झालेल्या होत्या. त्यानंतर या टोळ्यांना पायबंद घालण्यात यश आलेले होते. परंतु, पुन्हा या टोळ्या गेल्या काही महिन्यांपासून अॅक्टीव्ह झाल्याचे दिसत आहे.
धक्कादायक म्हणजे, अनेक घटनांमध्ये सीसीटीव्हीत आरोपी कैद झाले असले तरी त्यांचा मागोवा लागलेला नाही. पोलिस गस्त व पेट्रोलिंग अशा अनेक गोष्टी सुरू असताना देखील पोलिसांना गुन्हेगार सापडत नाहीत. अनेक महिन्यांपासून धुमाकूळ सुरू असताना पोलिस मात्र, टोळ्यांमध्येच अन् गाजलेल्या प्रकरणांत गुंतले गेल्याचेही एक कटू वास्तव आहे. एक घटना घडल्यानंतर पुर्ण गुन्हे शाखा अन् स्थानिक पोलिस त्याच्या मागावर असतात. त्याचाच फायदा बहुदा हे स्ट्रीट क्राईमवाले गुन्हेगारांना मिळत असावा. चैन स्नॅचिंग, मोबाईल लुटमार व घरफोड्यांच्या गुन्हेगारांकडे लक्षच देत नाही, हेच सत्य गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे.
गुन्हे शाखा फक्त वाहन चोर अन् तुटपळ गुन्हेगारांकडे
गुन्हे शाखेकडून शहरातील टोळ्यांवर विशेष लक्ष असले तरी इतर गुन्हेगारांकडे साफ दुर्लक्ष असल्याचेच दिसत आहे. गुन्हे शाखेची पथके एखाद दुसरा तडीपार, किंवा मोबाईल चोरटा, घरफोडीतला गुन्हेगार पकडला जात आहे. पण, चमकादर कामगारी गेल्या काही वर्षांपासून झालेलीच नसल्याचे दिसते.
पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या तक्रारींवर “तपास सुरू आहे” एवढेच उत्तर मिळते, पण प्रत्यक्षात गुन्हेगार मोकाट आहेत. गँगवॉरकडे पोलिसांचे अधिक लक्ष असल्याने सामान्य चोरीच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन असुरक्षित बनले आहे.
| चेन स्नॅचिंग | गुन्हे | उघड गुन्हे |
|---|---|---|
| सप्टेंबर २०२५ | १२८ गुन्हे | ६८ उघड |
| सप्टेंबर २०२४ | ८५ गुन्हे | ५० उघड |






