१५ सप्टेंबर रोजी कामोठे परिसरात अंमली पदार्थांची खरेदी-विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पथकाला तातडीने कारवाईचे आदेश देत शिवकल्पतरू आर्केड परिसरात सापळा रचला.
यावेळी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या महेश शिवलखन सिंग (३४, कामोठे) याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ६.५ ग्रॅम हेरॉईन आढळून आले. पोलिसांनी हेरॉईन जप्त करून महेश सिंगला अटक केली.
ड्रग्ज माफियांवर थेट प्रहार! Ratnagiri पोलिसांनी सुरू केली ‘ही’ विशेष धडक मोहीम
खारघरपासून सायनपर्यंत पुरवठा साखळी उघड
महेश सिंग याच्याकडे केलेल्या चौकशीतून अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर पथकाने नवी मुंबई तसेच मुंबई परिसरात कारवाई करत हरप्रितसिंग उर्फ हॅरी, जगदेवसिंग उर्फ जग्गी (३८) आणि जगप्रितसिंग उर्फ निज्जर (२६) यांना ताब्यात घेतले.
हरप्रितसिंग याला खारघर, जगदेवसिंग याला बोरीवली, तर जगप्रितसिंग याला सायन कोळीवाडा परिसरातून अटक करण्यात आली. तसेच हा अंमली पदार्थांचा साठा पुढे कळंबोली परिसरात विक्रीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती तपासात समोर आल्यानंतर करीयाठिल चकाला एल्विन अँटोनी (३४) यालाही पोलिसांनी अटक केली.
पाचही आरोपींवर गुन्हा; पुढील तपास सुरू
याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या रॅकेटचे आणखी धागेदोरे, अंमली पदार्थांचा पुरवठा कुठून होत होता आणि या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील करीत आहेत.
निगडे यांच्या पथकाची धडाकेबाज कामगिरी
अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराविरोधात नवी मुंबई पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखालील अंमली पदार्थविरोधी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे केलेली ही कारवाई विशेष ठरली आहे. अचूक नियोजन, सापळा आणि तपासाच्या माध्यमातून कामोठ्यापासून मुंबईपर्यंत पसरलेली पुरवठा साखळी उघडकीस आणण्यात पथकाला यश आले आहे.






