Carrom Tournament : बालदिनी रंगणार कॅरमचा थरार; प्रल्हाद नलावडे स्मृती चषकासाठी 64 खेळाडू सज्ज
बालदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या प्रल्हाद नलावडे स्मृती चषक 14 वर्षांखालील शालेय कॅरम स्पर्धेत (Carrom Tournament) विजेतेपदासाठी राज्यातील 64 खेळाडूंमध्ये चुरस रंगणार आहे. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, शशिकलाई फाउंडेशन आणि अविनाश नलावडे स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने 14 नोव्हेंबर रोजी या विनाशुल्क स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कांदिवली पश्चिम येथील साईनगरमधील मुंबई पब्लिक स्कूलच्या सभागृहात सिनको प्लॅटिनम चॅम्पियन कॅरम बोर्डवर ही स्पर्धा होणार आहे. यंदाच्या मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेतील विजेता केवल कुळकर्णी आणि बीएमसी-मुंबई पब्लिक स्कूल कांदिवलीचा सार्थक सिंग यांच्यातील लढतीने स्पर्धेची सुरुवात होईल. उद्घाटनप्रसंगी मुख्याध्यापक संदीपान घुले, कॅरमप्रेमी अविनाश नलावडे, शशिकलाई फाउंडेशनचे प्रमुख रामेश्वर लोहे, क्रीडापटू गोविंदराव मोहिते आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत आयडियल शालेय कॅरम स्पर्धेचा विक्रमी विजेता पोद्दार अकॅडमी-मालाडचा प्रसन्न गोळे, एसकेकेई मुलुंडचा केवल कुळकर्णी, आरपीडी सावंतवाडीचा भरत सावंत, संकल्प व्हॅली-पुणेचा हर्षित शिंदे आणि विश्वनाथ विद्यालय-राजापूरची निधी सप्रे यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
याशिवाय नक्ष वैती, अनय म्हेत्रे, शिवांश मोरे, दुर्वेश चव्हाण, विहा राणे, गौरी सावंत आणि आरव आंजर्लेकर हे खेळाडूही विजेतेपदासाठी आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. त्यामुळे स्पर्धा रंगतदार होणार आहे.
Mumbai City FC : आय-लीगचा गोलमशीन आता मुंबई सिटीच्या ताफ्यात; लुका माजसेनशी करार
शालेय खेळाडूंचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा पुरस्कारांमध्ये वाढ करण्यात आली आहे. स्पर्धेतील पहिल्या १६ विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना स्ट्रायकरसह पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे बालदिनाच्या निमित्ताने होणाऱ्या या स्पर्धेत चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, या स्पर्धेत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कॅरमप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन स्पर्धेच्या आयोजकांनी केले आहे.






