गौरव आहुजाच्या पोलिस कोठडीत वाढ (फोटो - सोशल मिडिया)
पुणे;आलिशान कार सिग्नलला थांबवून रस्त्यावरच लघुशंका करणारा तसेच हटकल्यानंतर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने एक दिवसांची वाढ केली. तर, शेजारी बिअरची बॉटल हातात घेऊन बसलेला भाग्येश ओसवालची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तत्पुर्वी पोलिसांनी गौरवला तपासासाठी जिथे लघुशंका केली, त्याचठिकाणी पुन्हा पायी चालवत नेले आणि गुन्ह्याचा पंचनामा केला. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
गौरव मनोज आहुजा (वय २५, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) याला एक दिवसाची पोलीस कोठडी, तर भाग्येश प्रकाश ओसवाल (वय २२, रा. मार्केट यार्ड) याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांत सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणे, (भारतीय न्यायसंहिता कलम २७०, २८१, २८५, ७९, महाराष्ट्र पोलीस कायदा १८४, १२२, तसेच दारूबंदी कायद्यान्वये ६५, ८५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव व भाग्येश दोघे मित्रांनी मध्यरात्री पार्टी केली. नंतर आलिशान कारने जाताना गौरवने शास्त्रीनगर चौकाच्याच सिग्नलला रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून रस्त्यावरच लघुशंका केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणात पोलिसांनी गौरवला अटक केली. दरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपल्याने दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. घटनेतील गाडी जप्त केली आहे.
परंतु, गाड्याच्या नंबरप्लेट काढून ठेवण्यात आलेल्या आहेत. आरोपी गौरवरचा मोबाईल जप्त करायचा असून, त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. तर, आरोपींच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गौरवच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ केली. तर भाग्येश याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
जिथे घडलं पुन्हा तिथे..!
गौरवने दारूच्या नशेत तसेच श्रीमंतीचा माज दाखवत ज्याठिकाणी लघुशंका केली होती, त्याचठिकाणी पोलिसांनी सोमवारी गौरव आणि भाग्येश या दोघांना तपासासाठी नेले. गुन्ह्याचा पंचनामा करण्यात आला. दोघे आलिशान कारने त्याठिकाणी उभा होते. पण, आज चेहऱ्यावर काळा कपडा टाकून पोलिसांनी हाताला धरून त्यांना पायी चालवत याठिकाणी आणले होते. त्यावेळी बघ्यांची मोठी गर्दी देखील झाली होती.
दरम्यान, गौरव अहुजाचा माफी मागतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. एका वृत्तवाहिनीने गौरवच्या माफीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “नमस्कार, मी गौरव अहुजा, राहणार पुणे. माझ्याकडून सार्वजनिक ठिकाणी जे कृत्य घडले ते अत्यंत चुकीचे होते. त्यामुळे मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता, पोलीस विभाग आणि शिंदे साहेब यांची मी माफी मागतो. कृपया मला माफ करा आणि मला एक संधी द्या. तसेच, मी पुढील आठ तासांत येरवडा पोलिसांसमोर हजर होणार आहे. माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना त्रास देऊ नका.” आता येरवडा पोलीस या प्रकरणात पुढील काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






