कराडमध्ये मोबाईल बदलण्यावरुन वाद; दुकानातील कर्मचाऱ्याने धक्का दिला अन् पुढे जे घडलं…
कराड : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, खुनाचा प्रयत्न, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांनाही यश मिळत नाही. अशातच आता कराडमधून एक मोठी घटना समोर आली आहे. अशातच आता कराड शहरातील बसस्थानक परिसरात मोबाईल बदलण्यावरून झालेल्या वादानंतर एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. अखिलेश नलवडे (वय २१) रा. गजानन सोसायटी, कराड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणी अजीम मुल्ला (रा. शिवाजीनगर, मलकापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दुकानातील कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेशने तीन दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरातील मोबाईल शॉपीतून नवीन मोबाईल खरेदी केला होता. मात्र, त्यातील कॅमेरा नीट कार्यरत नसल्याने मोबाईल बदलण्यासाठी तो दोन मित्रांसह रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास दुकानात गेला. मोबाईल बदलण्याच्या मुद्द्यावरून दुकान मालकाशी त्याचा वाद झाला. त्याचवेळी फरशी पुसण्याचे काम सुरू असताना अखिलेशच्या चपलेने फरशी घाण झाली. त्यामुळे वाद अधिकच चिघळला. दरम्यान, दुकानातील कर्मचाऱ्याने अखिलेशला धक्का दिल्याने तो खाली कोसळला. त्यानंतर मित्रांनी त्याला उपचारासाठी तातडीने कराड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कराड शहरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
हे सुद्धा वाचा : आंदेकर टोळीचा खेळ खल्लास; 27 बँक खाती पडताळली अन् लाखोंची मालमत्ता गोठवली
कोथरूडमधील गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट
पुण्यातील कोथरूड भागातील शिंदे चाळ परिसरामध्ये गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली होती, या गोळीबाराच्या घटनेमध्ये आता नवीन माहिती समोर आली आहे. सुरूवातीला एकावर गोळीबार झाल्याचं समजलं होतं. मात्र एक नाहीतर दोघांवर हा हल्ला झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. एकावर गोळी चालवली त्यासोबतच दुसऱ्यावर कोयत्याने हल्ला केल्याचं समजत आहे. हे गुन्हे कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ टोळीच्या सदस्यांनी केले आहेत. याप्रकरणी आता न्यायालयाने घायवळ टोळीच्या सदस्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींचे गुन्ह्यात आणखी कोण साथीदार आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत.