दगड डोक्यात घालून हत्या (फोटो- istockphoto)
नारायणगाव: एक आठवड्यापूर्वी उसने दिलेले शंभर रुपये चार चौघांमध्ये परत मागितल्याच्या कारणावरून तसेच शिवीगाळ केल्यावरून एक जणाने डोक्यात लाकडी दांडका व दगड घालून हत्या केल्याची घटना शुक्रवारी, दि. १३ रोजी रात्री नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ग्रामदैवत मुक्ताई देवी यात्रा मैदानावर घडली.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राहुल भाऊसाहेब गुळवे (वय ३२ वर्षे, राहणार शिपलापूर पानवडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, सध्या राहणार बाजारतळ नारायणगाव) याने आठ दिवसांपूर्वी मयत बाळू महादेव पोखरकर (वय ४१, रा. खोडद, ता.जुन्नर) यांच्याकडून दारू पिण्यासाठी शंभर रुपये उसने घेतले होते.
हे पैसे आठ दिवसांपासून सतत परत मागितल्याच्या तसेच शिवीगाळ केल्याच्या कारणावरून आरोपी गुळवे याने पोखरकर याला शुक्रवार दिनांक १३ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बस स्थानकापासून नारायणगाव येथील मुक्ताई देवी यात्रा मैदानात ओढत नेऊन डोक्यात लाकडी दांडके व दगड घालून हत्या केली. दरम्यान नारायणगाव पोलिसांनी २४ तासाच्या आत ही घटना उघडकीस आणली असून नारायणगाव बस स्थानकाजवळील सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींच्या जबावावरून आरोपीचा शोध घेण्यात आला असल्याचे शेलार यांनी सांगितले. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार करीत आहेत.
शेतकऱ्याच्या घरी भरदिवसा चोरी
यड्राव (ता. शिरोळ) येथे भाजीपाला तोडणीसाठी शेतात गेल्याची संधी साधून चोरट्याने शेतकऱ्याच्या घरात भरदिवसा चोरी केली आहे. कुलूप तोडून घरातील दोन तिजोऱ्या फोडून सुमारे साडेपाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख दोन हजार रुपये असा एकूण तीन लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे. इक्बाल महेर आलासे (रा. रेणुकानगर, यड्राव) यांच्या फिर्यादीनुसार याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
इक्बाल आलासे शुक्रवारी (दि. १२) दुपारी तीनच्या सुमारास कुटुंबियांसह शेतात भाजीपाला तोडणीसाठी गेले होते. त्यानंतर शेजारील नागरिकाने घराला कडी असल्याचे आलासे यांना फोनवरून सांगितले. शेजारील नागरिकाच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल केला आणि कडी काढून घराची पाहणी केली असता, दोन तिजोऱ्या फोडून साहित्य विस्कटून पडल्याचे दिसले. आलासे कुटुंबीय घरी आले आणि घरात चोरी झाल्याची माहिती शहापूर पोलिसांना दिली.
हेही वाचा: शेतकऱ्याच्या घरी भरदिवसा चोरी; दागिन्यांसह साडेतीन लाखांचा ऐवज चोरला
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.