पिंपरी: ‘आधार कार्डचा आर्थिक गैरव्यवहारासाठी वापर झाला असून, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे’ असे सांगून एका महिलेची तब्बल सात लाख २७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चिखली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी फिर्यादी महिलेशी फोनवर संपर्क साधला. त्या व्यक्तींनी स्वतःला ‘आधार विभागाचे अधिकारी’ असल्याचे भासवले. आधार क्रमांक आर्थिक फसवणुकीसाठी वापरला गेला असून, त्या प्रकरणी मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची भीती महिलेला दाखवण्यात आली.
नंतर पीडितेला पोलिस पडताळणीसाठी प्रमाणपत्र मिळवण्यास सांगण्यात आले व एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे निर्देश दिले गेले. त्या व्यक्तीने महिलेकडून तिच्या बँक खात्याची तसेच अन्य वैयक्तिक कागदपत्रांची माहिती घेतली.
यानंतर ‘तुमच्या खात्यातील रक्कम रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे ट्रान्सफर करावी लागेल’ असा खोटा सांगावा करून महिलेला ४,८७,५०० रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्या कागदपत्रांचा वापर करून आरोपींनी तिच्या नावावर कर्ज उचलून आणखी २,४०,००० रुपये त्यांच्या खात्यावर घेतले. एकूण रक्कम ७,२७,५०० रुपये झाल्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि तिने तत्काळ चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक फडतरे करत आहेत.
पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील ६५ हजार नागरिकांना वर्षाच्या आत ११०० कोटींहून अधिक गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्याचं जाळ अधिक घट्ट होऊ लागलं असून, यंदाचे वर्ष शेअर मार्केट, गुंतवणूकीवरील जादा नफा, वर्क फ्रॉर्म होम, टास्क फ्रॉड या चार प्रकारात सर्वाधिक फसवणूक केल्याचे पोलीस दप्तरी दाखल झालेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. तर वर्षानुवर्षे सुरू असलेला डेबीड कार्ड तसेच सेक्सस्टॉर्शन फसवणूकही सुरूच असून, त्यात देखील तक्ररी वाढत असल्याचे दिसत आहे.
सांस्कृतिक शहरातील स्ट्रीट गुन्हेगारीपेक्षा भयावह परिस्थिती सायबर गुन्ह्यांची झाली आहे. फक्त, सायबर गुन्हेगार वैयक्तिक संदंर्भात असल्याने तिची भिषणता तितकी सध्या तरी दिसत नाही किंवा पाहिली जात नाही. मात्र खऱ्या अर्थाने हे गुन्हेगार थेट आर्थिकनुकसान करत असल्याने पुर्ण आयुष्याची घडी विसकटली जात आहे. त्यासोबतच मानसिक त्रास देखील प्रचंड सहन करावा लागतो. कुटूंबाला ही धग सोसावी लागत असल्याचे काही प्रकरणातून समोर आलेले आहे.