बंडू आंदेकर टोळीतील आणखी एका गुंडाला ठोकल्या बेड्या; 'या' परिसरातून सापळा रचून पकडले
पुणे : दोन टोळ्यांच्या संघर्षातून आयुष कोमकरचा गोळ्या झाडून खून केल्यानंतर पसार झालेल्या बंडू आंदेकर टोळीतील सराइताला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आंदेकर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आलेली आहे. दत्ता बाळू काळे (वय २४, रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राहल खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी व त्यांच्या पथकाने केली आहे.
एक वर्षांपुर्वी (दि. १ सप्टेंबर २०२४) रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा टोळी युद्धातून सोमनाथ गायकवाड व त्याच्या टोळीने खून केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून केला होता. त्यानंतर या टोळीवर मोक्का कारवाई केली होती. या टोळीतील काही जण अद्यापही पसार आहेत. दरम्यान, सोमनाथ गायकवाड आणि साथीदारांच्या घराच्या परिसरात आंदेकर टोळीतील सराइत दत्ता काळेने पाळत ठेवली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर काळे पसार झाला होता. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते. काळे लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाच्या परिसरातील उड्डाणपुलाजवळ थांबला होता. याबाबतची माहिती पोलीस कर्मचारी महेश बारावकर, मंगेश पवार यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून काळेला पकडले.
आंदेकर टोळीच्या अडचणीत वाढ
वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली होती. आयुष हा बंडू आंदेकरचा नातू आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणात गणेश कोमकरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर बंडू आंदेकरने आयुषच्या खुनाचा कट रचला होता. अमन पठाण आणि यश पाटील यांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. आयुष कोमकर खून प्रकरणात या प्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०) याच्यास साथीदारांना अटक करण्यात आली. आंदेकरसह साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ करवाई करण्यात आली होती. आंदेकर टोळीविरुद्ध खंडणी, बेकायदा फलक लावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जमीन व्यवहारात फसवणूक केल्या प्रकरणी बंडू आंदेकरसह बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध उत्तमनगर पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे.