स्वत:च्या मुलाला भेटायला सासरवाडीला गेला; मेव्हण्याच्या मुलाने पाठलाग केला अन् भर रस्त्यात...
पुणे : मुलाला भेटण्यासाठी सासूरवाडीला गेल्यानंतर तिथे मुलाला भेटण्यावरून वाद झाला. या वादानंतर मेव्हण्याच्या मुलाने व त्याच्या साथीदारांनी अत्याच्या पतीवर पाठलाग करून कोयत्याने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. आंबेगाव बुद्रुक परिसरात ही घटना गुरुवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
राजू दत्तू जगताप (वय ६२, रा. किरकटवाडी) असे या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी प्रसाद भारत निकाळजे (वय १८), समीर इंद्रजीत थापा (वय २८) आणि यश विनोद निकाळजे (वय २३, रा. चंदननगर) यांना अटक केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू जगताप हा प्रसाद याच्या अत्याचा पती आहे. राजू याने २०१६ मध्ये पत्नीचा खून केला होता. खुनानंतर त्याला अटक झाली. न्यायालयाने त्याला याप्रकरणी शिक्षा सुनावली होती. शिक्षा भोगून तो २०२३ मध्ये बाहेर आला. त्याला एका मुलगा आहे. तो मुलगा मामा म्हणजेच प्रसाद याच्या आई वडिलांकडे राहतो. त्याला भेटण्यासाठी राजू हा दोन दिवसांपूर्वी चंदननगर भागातील त्यांच्या घरी गेला होता. त्याने मुलाला भेटायला आल्याचे सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद विवाद झाला होता. या वादानंतर मेव्हणा भारत याचा मुलगा प्रसाद याने दोन मित्रासोबत राजूचा पाठलाग केला. ते रिक्षा घेऊन किरकट वाडीकडे जात असताना त्याला आपला पाठलाग केला जात असल्याचा संशय आला.
दरम्यान त्यावेळी त्याने नवले पुलापासून रिक्षा आंबेगाव बुद्रुक परिसरात नेली. तेव्हा आरोपींनी त्याची रिक्षा पाठलाग करून दुचाकीने अडवली. तसेच वाद घालत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करून पसार झालेल्या तिघांना अटक केली आहे. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : तोतया आयकर अधिकारी घरात शिरले, कागदपत्रे तपासण्याचे ढोंग केले अन्…
कराडमध्ये मोबाईल बदलण्यावरुन वाद
कराडमधून एक मोठी घटना समोर आली आहे. अशातच आता कराड शहरातील बसस्थानक परिसरात मोबाईल बदलण्यावरून झालेल्या वादानंतर एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. अखिलेश नलवडे (वय २१) रा. गजानन सोसायटी, कराड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणी अजीम मुल्ला (रा. शिवाजीनगर, मलकापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दुकानातील कर्मचाऱ्याचे नाव आहे.