गुन्हे शाखेकडून चोरट्यांचा पर्दाफाश; धायरीतील सराफी पेढीत घुसून लुटमार करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील धायरी परिसरातील रायकर मळा येथील श्री ज्वेलर्स या सराफी पेढीत भरदिवसा घुसून सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या तीनपैकी दोन आरोपींना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. तर फरार झालेल्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.
राजेश चांगदेव गालफाडे (वय ४०) आणि श्याम शेषेराव शिंदे (वय ३७, दोघेही रा. लांडेवाडी, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर यापू्र्वी एक गुन्हा दाखल आहे. दरम्यान, अद्याप चोरीचा माल हस्तगत केलेला नाही. ही कामगिरी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त गणेश इंगळे व राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शानाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे (दोन) वरिष्ठ निरीक्षक संदीपान पवार, सहायक निरीक्षक सी. बी. बेरड, उपनिरीक्षक दिनकर लोखंडे, संदीप येळे, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे यांनी केली.
धायरीतील रायकरमळा येथे भरदुपारी सराफी दुकान शिरलेल्या तिघांनी खेळण्यातील पिस्तूल दाखवून दुकानमालक व कामगाराला धमकावले आणि ३० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नांदेड सिटी पोलिसांसह गुन्हे शाखेकडून याचा समांतर तपास केला जात होता. या तपासासाठी गुन्हे शाखेची १२ पथके कार्यकत होती.
घटनास्थळापासून पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली. त्यात आरोपींनी दुचाकी सोडून रिक्षातून प्रवास केल्याचे दिसून आले. त्या रिक्षाच्या मार्गावरील ‘सीसीटीव्ही’ तपासत पोलीस ससून रुग्णालयापर्यंत पोहोचले. तेथून चोरट्यांनी दुसरी रिक्षा केली आणि ते भोसरीला गेले. ससूनमध्ये रिक्षा बदलल्यानंतर कॅमेऱ्यामध्ये त्यांचे चेहरे स्पष्ट दिसून आले. त्यातून त्यांची ओळख पटली; तसेच खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक (दोन) आरोपींपर्यंत पोहोचले. त्यांनी गालफाडे आणि शिंदे यांना ताब्यात घेतले. त्यानंतर हे पथक तिसऱ्या आरोपीच्या मागावर गेले.
चोरट्यांनी सराफी पेढीत मालकाला पिस्तुलाच्या मुठीने डोक्यात मारले. त्यावेळी पिस्तुल तुटले. तेव्हा पिस्तुल नकली असल्याचे मालक व तेथील कामगाराला कळाले. त्यातच चोरटेही घाबरले. त्यामुळे त्यावेळी हाताशी आलेले दागिने घेऊन ते पसार झाले. या प्रकरणी दोघांना अटक केली असून, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
– निखील पिंगळे, उपायुक्त, गुन्हे शाखा
चकवा देण्यासाठी ‘ससून’मध्ये रेंगाळले
पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपी धायरीतून ससून रुग्णालयात आले. तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. ‘ससून’ परिसरात ते सुमारे तासभर रेंगाळले. त्यानंतर त्यांनी येथून दुसरी रिक्षा पकडून भोसरीचा प्रवास केला. ‘ससून’मध्ये दर मिनिटाला मोठ्या संख्येने वाहनांची विशेषत: रिक्षांची ये-जा होते. याची चोरट्यांना कल्पना होती. त्यामुळेच पोलिसांना चकविण्यासाठी ते ‘ससून’मध्ये आले होते.