गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह तिघांना बेड्या; अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई
पिंपरी : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह एकूण तीन जणांना अटक केली आहे. आरोपींकडून ९६ किलो गांजा आणि दोन चार चाकी वाहनासह ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे. संजय पांडुरंग मोहिते, मनसाराम नूरजी धानका यांच्यासह महिलेला अटक करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड हे पोलीस अंमलदार निखिल वर्पे यांच्यासह गस्त घालत होते. दोन चार चाकी वाहनांमधून गांजाची तस्करी केली जात आहे, अशी गुप्त माहिती त्यांना मिळाली. पुणे- नाशिक महामार्गावरील रोहकल फाटा या ठिकाणी नाकाबंदी करून दोन्ही वाहन ताब्यात घेण्यात आली. दोन्ही वाहनातील एकूण तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे विचारपूस करण्यात आली. यात एका महिलेचा देखील समावेश होता.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या समक्ष वाहन तपासल्यानंतर दोन्ही वाहनात एकूण सहा पोत्यांमध्ये ९६ किलो २०४ ग्रॅम गांजा आढळून आला. संजय पांडुरंग मोहिते, मनसाराम नूरजी धानका यांच्यासह महिलेला अटक करण्यात आली आहे. यापैकी संजय मोहिते याच्यावर कामशेत आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहराच्या मध्यभागात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्या दोघांकडून ८२० ग्रॅम गांजा जप्त केला असून, युनिट एकच्या पथकाने ही कारवाई शुक्रवार पेठेत केली आहे. समाधान केदा पवार (वय ३३, रा. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार सुजय रिसबुड व त्यांच्या पथकाने केली आहे.
दोन स्कॉर्पिओसह 53 किलो गांजा जप्त
राज्यात गांजा तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गांजा विक्रीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं गेल्या काही दिवसाखाली शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन स्कॉर्पिओ जप्त करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून, शिक्रापूर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमध्ये पोलिसांनी 53 किलो गांजा तब्यात घेतला आहे.