सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताय? तर थांबवा; 'इथं' पोलिसांनी केली धडक कारवाई
मालेगाव : सध्या जिल्ह्यात ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ हा स्लोगन जोरदार व्हायरल होत आहे. संपूर्ण नाशिक जिल्हा कायदा व सुव्यवस्थेचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करून पाहत आहे. मालेगाव पोलिसांनी देखील नाशिकपाठोपाठ ‘अॅक्शन मोड’वर येत कारवाईला सुरुवात केली. त्यानुसार, शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या वीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली.
शहराच्या पूर्व भागात तलवारी नाचवणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवत त्यांची धिंड काढण्यात आली. कारवाईचे सर्वसामान्य मालेगावकरांनी स्वागत केले आहे. शनिवार आणि रविवारी (दि. १२) मालेगाव कॅम्प व छावणी पोलिसांनी संयुक्तपणे शहरात ही कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक दर्शन दुग्गड याच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चक्क रिक्षात बसून शहरात फेरफटका मारत मद्यपान करणाऱ्या तळीरामांना ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात हजर केले. गेल्या काही दिवसांपासून मालेगातील अनेक ठिकाणी सर्रासपणे मद्यपान होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानुसार, पोलिसांनी कडक कारवाई केली.
हेदेखील वाचा : Mumbai Police: 48 वर्षांनंतर पोलीस दारात! १९७७ मध्ये केला होता हत्येचा प्रयत्न, शेवटी निवडणूक आयोगच मदतीला
दरम्यान, मालेगाव शहरात एका संशयित तरुणाने वादग्रस्त रील बनवून शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. सदर रिलस्टार लवकरच आपला माफीनामा व्हिडिओद्वारे जनतेसमोर सादर करेल, अशी खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
झाडाझुडपाच्या आडोशाला बसून मद्यपान
झाडाझुडपाच्या आडोशाला बसून काही तरुण मद्यपान करून सार्वजनिक शांतता भंग करत होते. यामुळे अनेकदा नागरिकांनी दबक्या आवाजात पोलिसांकडे तक्रार देखील केली होती. अखेर मालेगाव उपविभागीय पोलीस उपअधीक्षक दर्शन दुग्गड यानी पथकांची नेमणूक करून कारवाईला सुरुवात केली. या अंतर्गत छावणी व कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील मोकळ्या भूखंडांवर मद्यपान करणाऱ्या तळीरामांना अटक केली.