
गर्भवती महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीने बेडरूमचा दरवाजा ठोठावला पण नंतर...
छत्रपती संभाजीनगर : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात आत्महत्या प्रकरणात लक्षणीय वाढ होत आहे. असे असताना आता गंगापूर शहरातील माऊलीनगर परिसरात एका गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पूजा अमित सवई (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, ती आठ महिन्यांची गर्भवती होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा आणि तिचे पती अमित सवई हे मूळचे लातूरचे असून, अमित पंचायत समितीमध्ये रोजगार हमी योजनेत अभियंतापदावर कार्यरत आहेत. ते माऊलीनगर येथे पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासह भाड्याच्या घरात राहत होते. घटनेच्या वेळी अमित किराणा आणण्यासाठी बाहेर गेले होते. तर पुजा आठ महिन्यांची गरोदर असल्याने तिची आई तिची देखभाल करण्यासाठी घरीच होती व स्वयंपाकात व्यस्त होती. तर पुजा बेडरूममध्ये विश्रांती घेत होती.
हेदेखील वाचा : Solapur Crime: त्याला दुसऱ्यासोबत ठेवायचे होते संबंध, म्हणून बायकोचा घेतला जीव; सोलापूरात खळबळ !
अमित घरी आल्यानंतर त्यांनी पुजाला आवाज दिला, दरवाजा ठोठावला; परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी येऊन बेडरूमचा दरवाजा तोडला असता पूजा ओढणीने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिला खाली उतरवून तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदपाठक आणि डॉ. विशाल सुर्यवंशी यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
दोन जीवांचा दुर्दैवी अंत
पोटात आठ महिन्यांचा गर्भ असल्याने दोन जीवांचा दुर्दैवी अंत झाल्याचे पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिस सखोल करीत असल्याची महिती देण्यात आली.
अकस्मात मृत्यूची नोंद; पोलिसांचा तपास सुरु
या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. तरुण, शिक्षित आणि गरोदर महिलेने अशाप्रकारे जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
हेदेखील वाचा : Nashik Crime: ७५ वर्षीय नराधमाने चिमुरडीवर केले सहा महिने अत्याचार, चिमुकलीला पैसे आणि चॉकलेटचे आमिष दाखवत…