पुणे: कोथरूड भागात आयटी इंजिनिअर तरुणाला झालेल्या मारहाणप्रकरणात पुणे पोलिसांनी मोक्का कारवाईकरून कुख्यात गँगस्टर गजा मारणेला अटक केली. मंगळवारी मारणेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान याप्रकरणात मात्र, त्याच्या वकिलांनी खोटा गुन्हा नोंद केला असून, अटक आरोपींच्या मूलभुत अधिकारांची पायमल्ली पोलिसांकडून केली जात असल्याचे म्हंटले आहे. त्याबाबत हायकोर्टात दाद मागणार असल्याचे देखील सांगितले.
गजानन पंढरीनाथ मारणे (वय ६१, रा. हमराज चौक, शास्त्रीनगर, कोथरूड) असे कोठडी मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (वय ३५), किरण कोंडिबा पडवळ (वय ३१) अमोल विनायक तापकीर (वय ३५, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) यांना अटक केली आहे. तर, मारणेचा भाचा श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार याच्यासह रूपेश मारणे पसार आहे.
कोथरूड भागात सात दिवसांपुर्वी मारणे टोळीतील गुंडाकडून देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण झाली. मारहाणप्रकरणात प्रथम पोलिसांनी ३२४ नुसार गुन्हा नोंदवला होता. पण, हे प्रकरण राजकीय दृष्टया तापल्यानंतर मात्र पोलिसांनी कारवाईची फास आवळत यात खूनाचा प्रयत्नाचे कलम वाढविले. नंतर त्यात मोक्का कारवाईकरून टोळीप्रमुख म्हणून गजानन मारणे व रूपेश मारणे यांची नावे घेतली. गुन्ह्यात नाव आल्यानंतर गजा मारणे स्वत: सोमवारी कोथरूड पोलिसांत हजर झाला. दरम्यान, त्याला अटककरून आज मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलीस दबावाखाली कारवाई करत आहेत
गजा मारणे याच्यावर दाखल केलेला गुन्हा हा पुर्णपणे खोटा आहे. पोलीस दबावाखाली कारवाई करत आहेत, असे गजानन मारणे याचे वकिल विजयसिंह ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मारहाण करणाऱ्या आरोपींना त्यांनी प्रोत्साहन दिले, असे पोलीस म्हणत आहेत. पण गजा मारणे घटनास्थळावर घटनेच्यावेळी उपस्थित नव्हता. सहा दिवसांनी गजा मारणे, रूपेश मारणेची नावे समोर आणली गेली. प्रथम हा गुन्हा किरकोळ होता. ३२४ नुसार गुन्हा दाखल होता. पण, नंतर ३०७ व मोक्का कारवाई केली. हे दबावाखाली असल्यामुळे झाले. गजा मारणे स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. पण, त्याला चप्पल काढून खाली फरशीवर बसविले गेले व त्याचे फोटो व्हायरल केले गेले. अटक आरोपींच्या मुलभूत अधिकारांची पायमल्ली केलेली आहे. यासंदंर्भात हाय कोर्टात दाद मागणार आहोत, असेही अॅड. ठोंबरे यांनी सांगितले.
गुन्ह्याचा तपास क्राईम ब्राँचकडे
गुंड गजा मारणे टोळीकडून आयटी इंजिनिअर तरुणाला झालेल्या मारहाणप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. सोमवारी हा तपास वर्ग केला असून, याप्रकरणात पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे. त्यानंतर हा गुन्हा वर्ग केला. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत. याप्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली आणि गुन्ह्यात खूनाचे कलम वाढत गजा मारणेला अटक केली. गजा मारणे गुन्ह्यात नाव आल्यानंतर स्वत:हून पोलिसांत हजर झाला होता.