पुणे पोलिसांची मोठी कारवाई; घरफोड्या अन् वाहन चोऱ्या करणाऱ्या सराईताला ठोकल्या बेड्या
पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाहन चोरी तसेच गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणी मोहिम राबवत असताना गुन्हे शाखेच्या युनिट सहाने एका सराईताला बेड्या ठोकल्या आहेत. त्याची झडती घेतली तर त्याच्याकडे घरफोडीतील सोन्याचे दागिने मिळाले. त्याच्याकडून घरफोडीचे ५, तर वाहनचोरीचे २ गुन्हे उघडकीस आले आहेत.
राहुल दगडू शिंदे (वय ३२, रा. पिरंगुट) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून पुणे, पिंपरी चिंचवडमधील चोरी, घरफोडी, वाहन चोरीतील गुन्ह्यामधील ६ लाख ४० हजार ३२२ रुपयांचे ८७ ग्रॅम सोन्याचे दागिन्यासह ७ लाख ४० हजार ३२२ रुपयांचा माल हस्तगत केला आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहीद पठाण सहायक निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले व त्यांच्या पथकाने केली आहे.
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेची पथके हद्दीत गास्त घालत आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे अधिकारी व अंमलदार हे वाघोली परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिसांना घरफोडीचे गुन्हे करणारा आरोपी लोहगाव – वाघोली रोडवरील डी मार्टजवळ उभा असल्याची बातमी मिळाली. बातमीच्या अनुषंगाने पथकाने जाऊन खात्री केली. तेव्हा राहुल शिंदे हा मोटारसायकलसह उभा होता. त्याच्याकडे मोटारसायकलविषयी चौकशी केली, तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली. त्यात त्याच्याकडे ८७ ग्रॅम वजनाचे वेगवेगळे सोन्याचे दागिने मिळाले. अधिक चौकशीत त्याने मोटारसायकल व दागिने चोरीचे असल्याची कबुली दिली.
हे सुद्धा वाचा : हा माज येतो कुठून? पुण्यात वाहतूक पोलिसाला चप्पलेने मारहाण; नेमकं काय घडलं?
सोन्याचे दागिने हे लोणीकंद व लोणी काळभोर परिसरातील विविध ठिकाणी घरफोडी करुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यातील घरफोडीचे ३ गुन्हे, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील २ गुन्हे तसेच रावेत व लष्कर पोलीस ठाण्यातील वाहनचोरीचे प्रत्येकी एक असे एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. राहुल याच्यावर शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात चोरी, घरफोडी, वाहनचोरीने अनेक गुन्हे दाखल आहेत.
हे सुद्धा वाचा : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक; तब्बल 32 लाखांना घातला गंडा