संग्रहित फोटो
पुणे : राज्यात पोलिसांना मारहाण केल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहर पोलीस बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असताना हडपसर भागात मात्र, पदपथावर लावलेल्या दुचाकीवर कारवाई करताना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला दोन महिलांनी धक्काबुक्की करून चप्पलेने मारहाण केल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बालिका सूर्यवंशी आणि संगीत लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस हवालदार आजिनाथ आघाव यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हवालदार आघाव हडपसर वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत. आरोपी महिलांनी हडपसर परिसरातील गाडीतळ भागात बेशिस्तपणे दुचाकी लावली होती. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास पदपथावर लावलेल्या दुचाकींवर कारवाई करण्यात येत होती. वाहने उचलणाऱ्या गाडीतील कर्मचारी (टोईंग व्हॅन) आरोपी महिलांची दुचाकी उचलत होते. त्या वेळी आरोपींनी कारवाईस विरोध करुन हवालदार आघाव यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान आरोपींनी हवालदार आघाव यांना चप्पलेने मारहाण करुन धक्काबुक्की केली. त्यांनी आघाव यांना धमकावले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : घोटाळ्यावरुन नाना पटोलेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले, डोळ्यातील अश्रू…
दुचाकीस्वार महिलेकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली दुचाकीस्वार महिलेने वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिसाला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याची घटना वारजे भागात घडली आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी दुचाकीस्वार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वारजे वाहतूक विभागातील पोलीस शिपाई ऋतुजा तांबे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका दुचाकीस्वार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई ऋतुजा तांबे दाेन दिवसांपूर्वी सायंकाळी वाहतूक नियमन करत होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार महिलेने वाहतूक नियमांचा भंग केला. विरुद्ध दिशेने निघालेल्या दुचाकीस्वार महिलेला पोलीस शिपाई तांबे यांनी अडवले. दुचाकीस्वार महिलेवर कारवाई करताना तिने पोलीस शिपाई तांबे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.
हे सुद्धा वाचा : अंडी व फळांसाठी निधी द्यावा, नाहीतर…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सरकारला इशारा