
सोनसाखळी हिसकावणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; लाखो रुपयांचा ऐवज जप्त
आकाश नरहरी शिंदे (वय २८, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शरद झिने, पोलिस निरीक्षक गजानन चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर पोलिस अंमलदार हनुमंत मासाळ, चेतन गोरे व त्यांच्या पथकाने केली आहे.
आकाश शिंदे याच्याकडून आंबेगाव पोलिस ठाण्यातील दोन, सिंहगड, बावधन तसेच खडक पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक असे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. खडक पोलिस ठाण्यातील सोनसाखळीच्या गुन्ह्यातील तो पाहिजे आरोपी आहे. जुना सातारा रस्त्यावरील गुजरवाडी परिसरात गाडी पार्क करून झोपलेल्या व्यक्तीकडील मोबाईल व गाडी चोरून नेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास आंबेगाव पोलीस करत होते. त्यावेळी हा गुन्हा आकाश शिंदे याने केल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल झाली. पोलिसांनी सोने व दुचाकी असा एकूण ३ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
उत्तमनगरमध्ये सराफी दुकान लुटण्याचा प्रयत्न
पुण्यातील उत्तमनगरमधील एनडीए रस्त्यावर शस्त्रधारी टोळक्याने ऐन वर्दळीच्या वेळी सराफी दुकानात घुसून लुटमार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतत रहदारी असलेल्या रस्त्यावर रात्री आठच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुकान मालकाने शस्त्रधाऱ्यांना विरोध करत आरडाओरडा केल्याने तिघे पसार झाले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात २८ वर्षीय तरुण व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, तीन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.