पुणे पोलीसांची मोठी कारवाई; हातभट्टीवर छापा टाकून हजारो लिटर दारु जप्त
पुणे : लोणी काळभोर परिसरातील रामदारा येथे असलेल्या गावठी दारू बनविणार्या हातभट्टीवर गुन्हे शाखेने छापा कारवाई केली. पोलिसांनी छापा कारवाईत दीड हजार लिटर तयार दारू, २० हजार लिटर रसायन व दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा ११ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, मध्यरात्री कारवाई झाल्याने अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मुकेश कर्णावत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पुणे शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे तसेच सुरू असलेल्या धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. तरीही छुप्या पद्धतीने काही ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. यादरम्यान, गुन्हे शाखा यूनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते. त्यादरम्यान रामदरा भागात हातभट्टीवर दारू बनविण्यात येत असल्याची माहिती पथकाला मिळाली. माहिती मिळताच कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर यांच्यासह पथकाने संबंधीत ठिकाणी छापा टाकला.
पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी कर्णावत याने तेथून पळ काढला. पोलिसांनी येथून दीड हजार लिटर तयार दारू, २० हजार लिटर रसायन आणि दारू बनविण्यासाठी लागणारे मोटार, ड्रम, एअर ब्लोअर असा एकूण ११ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
हे सुद्धा वाचा : वाघोलीत चोरट्यांनी किराणा दुकान फोडले; तब्बल लाखोंचा ऐवज चोरला
रत्नागिरी जिल्ह्यामधील हातभट्टीवर छापा
गेल्या काही दिवसाखाली रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावात पोलिसांनी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर छापा टाकला आहे. या छाप्यात ४० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवरुख पठारवाडी बांबरचा पऱ्या येथे विनापरवाना हातभट्टी दारूचा व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या हातभट्टीवर छापा टाकला. या छाप्यात ३८ हजाराचे ७५० लिटर गूळ व नवसागरमिश्रित उकळते रसायन बॅलरसहित, ५० रुपयांचा चाटू, ५०० रुपयांची अॅल्युमिनियम डेग तसेच २ हजार १०० रुपयांची वीस लिटर गावठी दारू असा सुमारे ४० हजार ६५० रुपयांचा पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला.