पुणे पोलीस अॅक्शन मोडवर; वर्षभरात सव्वा पाच हजार मद्यपींवर कारवाई
पुणे/अक्षय फाटक : कल्याणीनगर भागात घडलेल्या पोर्शे अपघातानंतर शहर पोलिसांनी मद्यपी चालकांच्या कारवाईवर भर दिला असून, कारवाई तब्बल दहापटींनी वाढली आहे. वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षभरात (२०२४) मध्ये ५३५० मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली असून, २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये मद्यपी वाहनचालकांवरील कारवाई वाढली आहे.
वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त आहेत. त्यात बेशिस्त वाहन चालकांचा ताप वाढतच चालला आहे. दुसरीकडे मद्यपी वाहनचालकांमुळे शहरात गंभीर अपघात झाल्याचे अनेक प्रकार सातत्याने पाहायला मिळत आहेत. मध्यरात्री आलिशान कार तसेच जड वाहने चालविणारे मद्य पिलेले असल्याचे दिसून आले आहे. यात काहींना प्राण गमवावा लागला असून, अनेक जण जायबंदी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली जाते. दरम्यान, ही कारवाई म्हणजे नाममात्र असल्याचे आतापर्यंत दिसून येत होते. कधी तरीच पोलीस नाकाबंदी लावून मद्यपी व बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगरताना दिसून आले. मात्र, वर्षात वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनांवरील कारवाईची तीव्रता वाढवली.
कारवाई वाढीचे विशेष कारण म्हणजे, कल्याणीनगर येथील हायप्रोफाईल अपघाताने राज्यभरात खळबळ उडाली होती. एका अल्पवयीन मुलाने मद्याच्या नशेत आयटी इंजिनिअर तरुण-तरणीचा जीव घेतला होता. यानंतर शहरातील मद्यपिऊन वाहने चालविणाऱ्यावर कडक कारवाई सुरू केली गेली आहे. वाहतूक पोलीस आता अचानक नाकाबंदी मोहिम राबवत आहेत. त्या सातत्याने राबविला जात असून, रात्रीसोबतच दिवसा देखील त्या राबविल्याने कारवाईत चांगली वाढ झाल्याचे दिसत आहे. २०२३ मध्ये केवळ ५६२ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली होती. त्या तुलनेत २०२४ मध्ये ५३५० मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सातत्याने सुरू ठेवल्यास आणखी संख्या वाढू शकते. तर दुसरीकडे मद्यपिऊन वाहने चालविणाऱ्यांना जरब बसू शकते.
पुण्यात कल्याणीनगर अपघात
गेल्या वर्षात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात ३९४ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली होती. मे महिन्यात कल्याणीनगर येथे भरधाव पोर्श कारची धडक बसून दोघांचा मृत्यू झाला. अपघात १८ मे रोजी झाला. नंतर पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांवरील कारवाई तीव्र केली. केवळ मे महिन्यात ३५८ जणांवर मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई केली. नंतर कारवाईचा आलेख वाढताच राहिला. सप्टेंबर महिना वगळता सर्वच महिन्यात मोठी कारवाई झाली, अशी माहिती वाहतूक पलिस शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; खूनाच्या प्रयत्नातील आरोपीला पकडले
थर्टी फस्टच्या दिवशी ८५ जणांवर कारवाई
नववर्षाचे स्वागत तसेच सरत्या वर्षाला निरोप देणाऱ्या पुणेकरांच्या सुरक्षेसाठी शहरात साडेतीन हजार पोलीस कर्मचारी, सातशे वाहतूक अंमलदारांचा बंदोबस्तावर होते. तर २७ महत्त्वाच्या ठिकाणी मद्यपी वाहनचालकांवर कारवाईसाठी नाकाबंदी केली होती. शहरात गेल्या वर्षभरात (२०२४) ५२६२ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये दर दिवशी सरासरी १४ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. त्यातुलनेत ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री ८५ वाहन चालकांवर कारवाई केली आहे.