सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार होण्याच्या तयारीत असलेल्या सराइत गुन्हेगाराला स्वारगेट पोलिसांनी एसटी स्थानकाच्या आवारात सापळा रचून पकडले. बस स्थानकात कारवाईचा थरार घडला. त्यामुळे प्रवासी कुतूहलाने पोलिसांच्या या कारवाईकडे पहात होते. तो सोलापूर येथे जाण्याच्या तयारीत होता.
अमोल रवी आडम (वय २४ रा. प्रथमेश अपार्टमेंट, शंकरनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक राहुल कोळंबीकर, संजय भापकर, कुंदन शिंदे, शंकर संपत्ते, सागर केकाण, राहुल तांबे, सुधीर इंगळे, सतीश कुंभार, विक्रम सावंत, शरद गोरे यांनी ही कारवाई केली.
अमोल हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध भारती विद्यापीठ, येरवडा, विश्रांतवाडी, कोंढवा पोलीस ठाण्यात अपहरण, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध स्थान बद्धतेची कारवाई केली होती. तो नुकताच या गुन्ह्यातून सुटून बाहेर आला होता.
हे सुद्धा वाचा : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक; तब्बल 38 लाखांना घातला गंडा
दरम्यान आडम आणि साथीदारने १७ डिसेंबर रोजी कात्रज भागातील आंबेगाव परिसरात दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. गुन्हा केल्यानंतर तो पसार झाला होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. यावेळी स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कुंदन शिंदे व राहुल तांबे यांना माहिती मिळाली की, आडम मूळगावी सोलापूर जाणार आहे. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात सापळा लावला. अमोल आडम बस स्थानकात आल्यानंतर सोलापूर बसकडे जात असताना त्याला पथकाने त्याला पकडले.
दोन तरुणांवर कोयत्याने वार
गेल्या काही दिवसाखाली भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, पसार झालेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.