
खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला ठोकल्या बेड्या; 'या' परिसरात सापळा रचून पकडले
पुणे : पुण्यासह राज्यभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याला आंबील ओढ्याजवळ सापळा रचून पकडण्यात यश आले आहे.
अनिकेत उत्तम जावीर (वय २३, रा. साने गुरुजीनगर, आंबील ओढ्याजवळ, सहकारनगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे, पोलिस निरीक्षक अविनाश माने, महिला उपनिरीक्षक तेजश्री पवार, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी तसेच कुंदन शिंदे, संदीप शिर्के, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, सर्जेराव सरगर, संतोष टकले, नागनाथ राख, विजय पवार, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, योगेश मांढरे, ओमकार कुंभार, शंकर कुंभार, आशीष यादव, विनायक वगैरे यांच्या पथकाने केली आहे.
पुणे शहरात गंभीर गुन्हे रोखण्यासाठी तसेच गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी व अंमलदार गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार महेश मंडलिक, कुंदन शिंदे व संदीप शिर्के यांना आरोपी अनिकेत जावीर याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. जावीर याच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याने पद्मावती येथील जय अंबे चौक येथे धारदार शस्त्राचा वापर करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो जावीर फरार होता. पोलिसांना तो आंबील ओढ्याजवळ थांबलेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर युनिट दोनच्या पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अनिकेत उत्तम जावीर असल्याचे सांगितले. गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.