सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुण्यातून ड्रग्ज हद्दपार करण्यासाठी पोलिस जंगजंग पछाडत असताना दुसरीकडे दुध खरेदीच्या लाईनप्रमाणे गांजाची लाईन लावून विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार अंमली पदार्थ विरोधी टाक्स फोर्सने उघडकीस आणला आहे. या किरकोळ विक्रेत्याला पकडल्यानंतर त्याचा म्होरक्याला देखील पथकाने अटक करून तब्बल २ किलो गांजा जप्त केला आहे. विशेष म्हणजे, यांच्याकडून गांजा खरेदी करणारे अन् पिणाऱ्या ४० जणांना पकडून त्यांचे समुपदेशन देखील केले आहे. या कारवाईने पुण्यात मोठी खळबळ उडवली आहे.
अजु अहमद शेख (वय ३९, रा. कोंढवा) आणि गणेश सिद्धु पाटोळे (वय २९, रा. बुद्धविहार सोसायटी, कोंढवा) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत. तर, त्यांचा आणखी एक साथीदार पसार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ टास्क फोर्स महाराष्ट्राच्या पुणे पथकाचे प्रमुख ज्योतिप्रिया सिंह, पोलिस उपमहानिरीक्षक प्रविण पाटील, पोलिस उपायुक्त अनुज तारे, पोलिस उपअधीक्षक नंदिनी वग्यानी, उपनिरीक्षक आशिष सरवदे, पोलिस राहूल होळकर व त्यांच्या पथकाने केली आहे.
दोघेही अंमली पदार्थांची विक्री करणारे सराईत गुन्हेगार आहेत. गणेश पाटोळे हा अजु शेख याच्याकडे पगारावर कामाला आहे. त्यांच्यावर यापूर्वी एनडीपीएसचे २ गुन्हे दाखल आहेत. त्यात २०० ग्राम गांजा बाळगल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल आहे. एएनटीएफच्या (अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स) पथकाकडून ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाई सुरू आहे. नव्याने स्थापन झालेल्या या पथकाकडून राज्यभरात कारवाया सुरू आहेत. दरम्यान, पथकाला कोंढव्यात अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिस पथकाने माहिती घेतली असता त्यांना काकडे वस्तीतील शिवनेरी गल्लीतील दर्ग्याजवळ पाटोळा हा लाईन लावून एका पिशवीत गांजा विक्री करत असताना दिसून आला. त्यानूसार त्याला सापळा रचून पकडले. त्यानंतर त्याच्या माहितीवरून अजु शेख याला पकडण्यात आले.
लाईन लावून गांजाची विक्री
एनटीएफ पथकाने गांजाची माहिती काढत असताना एक व्हिडीओच शेअर केला आहे. त्यात पाटोळे हा भररस्त्यावर एका पिशवीत गांजाच्या पुढ्या ठेवून त्याची विक्री करत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, गांजा घेण्यासाठी त्याच्याकडे दुध खरेदीसाठी जशी लाईन लागते, तशाच पद्धतीने घोळका अन् नंबरने गांजा घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ड्रग्ज विक्रेत्यांना पोलिसांची भितीच नाही का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
खरेदी करणारे ४० जणांना पकडले
पाटोळे तसेच अजु शेख याच्याकडून गांजा घेणाऱ्या अन् तो ओढणाऱ्या जवळपास ४० जणांना पोलिसांनी पकडले. त्यांना कोंढवा पोलिस ठाण्यात नेहून त्यांचे समुपदेशन केले. याप्रकरणात पोलिसांनी १४ दुचाकी, तिनचाकी गाड्या, ३५ मोबाईल तसेच २६ हजार ९६० रुपयांची रोकड आणि ३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गणेश याच्याकडून एक किलो आणि शेख याच्याकडून एक किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. शेख हा मोठा विक्रेता असल्याची माहिती आहे.






